तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील मंगरूळ  येथील 36 वर्षीय युवकाची डोक्यावर वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना 15 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, कृष्णा आनंद साठे (वय 36, रा. मंगरूळ) यांचा मृतदेह तुळजापूर-अक्कलकोट मार्गावर बुधवारी सकाळी मंगरूळपासून सुमारे एक ते दोन किलोमीटर अंतरावर एका पुलाजवळ आढळून आला. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून साठे यांच्या डोक्यात जड वस्तूने वार करून त्यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तपासासाठी फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. या घटनेमुळे मंगरूळसह संपूर्ण तुळजापूर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुळजापूर तालुक्यात खुन, मारामाऱ्या, दरोडे यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. हे तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या दृष्टीने लौकिकाला साजेसे नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सक्षम दर्जाचा अधिकारी नेमण्याची मागणी होत आहे.


 
Top