धाराशिव (प्रतिनिधी)- वैराग्य महामेरू संत गोरोबा काका यांच्या समाधी सोहळ्यात यावर्षीपासून वारकरी फडकरी दिंडी संघटना श्री क्षेत्र तेर जिल्हाध्यक्ष ह भ प महादेव महाराज तांबे आळणीकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व वारकरी फडकरी झालेल्या बैठकित नवीन उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. यावर्षी पहिल्यांदाच सर्व वारकरी, फडकरी आणि दिंड्यासोबत आलेल्या तमाम भाविकांच्या वतीने मंदिर पायरी भजन सोहळा आयोजित करण्यात आला. यात हजारो भाविक भक्तिरसात तल्लीन झाले होते.
बाराव्या शतकातील थोर संत व संत परीक्षक म्हणून गोरोबा काका यांची संत साहित्यात ख्याती आहे. त्यांच्या समाधी सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध भागातील दिंड्या दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने तेर नगरीत येतात. त्यामुळे तेरणा नदीकाठी हा सोहळा अधिकच भक्तिमय होतो. बाराव्या शतकापासूनची ही परंपरा आजही तेवढ्याच भक्तिभावाने सुरू आहे. काकांचा अगाध महिमा चिरंतन रहावा यासाठी समस्त वारकरी, फडकरी भजन संघटना पंढरपूर अंतर्गत उपशाखा तेर यांच्या वतीने मंदिर पायरी समाधी भजन सोहळा सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत पार पडला. ही परंपरा पुढे कायम राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी हभप विष्णू महाराज कबीर, हभप राशनकर महाराज पंढरपुरकर, हभप महादेव महाराज तांबे आळणीकर, हभप ज्ञानेश्वर तांबे महाराज आळणीकर, हभप अर्जुन महाराज लाड, हभप थोपटे महाराज देहूकर, हभप योगेश्वर महाराज इंगळे, हभप एकनाथ महाराज कापसे, तेर सरपंच फंड, तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, सुधाकर बुकन यांच्यासह फडकरी, दिंडी प्रमुख भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
