धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र सरकारकडून प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार करार शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि अन्नसुरक्षेसाठी घातक ठरणार असल्याचा आरोप करत युवक काँग्रेस, धाराशिवच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, या करारानुसार अमेरिकेतील कृषी उत्पादनांना शून्य टक्के आयात शुल्क लागू होण्याची शक्यता असून त्यामुळे स्वस्त परदेशी माल भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर येईल. परिणामी, भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळणार नाही आणि त्यांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम होईल. भारतातील बहुतांश शेतकरी हे लहान व अल्पभूधारक असून त्यांच्याकडे आवश्यक साधनसामग्री व सरकारी मदत मर्यादित आहे. अशा परिस्थितीत परदेशातील अनुदानित व प्रगत शेतकऱ्यांशी स्पर्धा करणे कठीण ठरणार असल्याने हा करार शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हा करार तातडीने रद्द करण्यात यावा आणि शेतकऱ्यांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदन देताना अभिजित चव्हाण, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश फुलचंद पवार, धवलसिंह लावंड, हनुमंत सांगळे, धीरज सोनवणे, प्रशांत झेंडे, समर्थ कदम, महेश म्हेत्रे, संकेत पडवळ, मोईज सय्यद, सौरभ गायकवाड आदी उपस्थित होते.

 
Top