धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महत्त्वाच्या विषयांना मंजुरी दिली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी वसुली संदर्भात शासनाने खास नागरिकांना दिलासा देण्यासाठी सुरू केलेल्या अभय योजनेचा कालावधी वाढविण्याचा मंजूर करून घेतला आहे. तसेच पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे व वाहनतळासाठी अर्धा एकर जागा केली आहे. शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय आजच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करून घेतले आहेत. या सर्वसाधारण सभेत भाजप व राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात गणेश नगराच्या पाईपलाईनवरून मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. 

धाराशिव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत मागील सभेचा इतिवृत्तात वाचून कायम करण्यात आला. तर मालमत्ता खर वसुली प्रभावीपणे व्हावी व मालमत्ताधारकांना दंडात सवलत देऊन कर भरण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर वसुलीची एक रकमी रक्कम भरणाऱ्या मालमत्ताधारकास दिलासा देणारी अभय योजना सुरू आहे. मात्र, त्याचा कालावधी 31 मार्चपर्यंत होता. तो कालावधी वाढवून घ्यावा अशी अनेक नागरिकांची मागणी होती. हा विषय अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी हा विषय सभेत मांडला त्यास सभागृहाने मंजूरी दिली. 

त्याबरोबरच शहरी नियोजनाच्या दृष्टीने वाहनतळ अत्यंत महत्त्वाचे व भविष्यातील वाढत्या गरजांचा विचार करून धाराशिव शहर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक - 27  मधील 21 आर म्हणजे अर्धा एकर जागा तसेच मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक - 94 वाहनतळासाठी अर्धा  एकर जमीन भूसंपादन करण्याचा ठराव बहुमताने पारित झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक असणारी तुरटी खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे. त्या ठरावास देखील सर्व संमतीने बहुमताने मंजुरी दिली आहे.


वाढीव मालमत्ताकराचे काय

शहरातील वाढीव मालमत्ताकरासंदर्भात 300 नागरिक अपीलामध्ये गेले आहेत. त्या संदर्भात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नगरपरिषदेने लवकरात लवकर निर्णय घ्या असे स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे वाढीव मालमत्ताकरासंदर्भातील निर्णय किती दिवसात लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निर्णय लवकर लागण्यास मालमत्ता कराच्या रुपाने नगर परिषदेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे. 


सभेत गोंधळ

तुतारी और कमल एकीच है हे प्रचंड व्हायरल झाल्यानंतर आज धाराशिव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगरसेवकांत गोंधळ पहायला मिळाला. जो विषय सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर नव्हता, जो विषय आयत्या वेळी मांडला गेला ज्याला सूचक आणि अनुमोदक नसताना गोंधळ झाल्याने हे सत्ताधारी गटाचे दबावतंत्र असल्याचे बोलले जात आहे. यावेळी शिवसेनेचे राजाभाऊ पवार यांनी सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त लोकांसाठी खुले केले नसल्याचा आरोपी करत सभा त्याग केला. 


 
Top