भूम (प्रतिनिधी)- भूम नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नियोजनाप्रमाणे पार पडली असून, बैठकीत मांडण्यात आलेल्या विविध अजेंड्यावरील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील नागरिकांनी आपल्याला त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी निवडून दिले असून, प्रत्येक नगरसेवकाने ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असा सल्ला नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांनी दिला. त्या सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
या पत्रकार परिषदेला गटनेते सुरज गाढवे, नगरसेविका रीमा शिंदे आणि नगरसेवक अभिजीत शेटे उपस्थित होते. नगराध्यक्षा गाढवे पुढे म्हणाल्या की, मुख्याधिकारी सभेला अनुपस्थित असल्यामुळे काही नगरसेवकांनी सभा रद्द झाल्याचा दावा केला. मात्र, सभागृहात आवश्यक कोरम पूर्ण असल्याने नियमांनुसार सभा घेण्यात आली. शहरातील स्वच्छता व विद्युत दिव्यांची कामे टेंडर प्रक्रियेशिवाय होऊ शकत नाहीत, त्यामुळे जनतेच्या सोयीसाठी सर्व नगरसेवक टेंडर प्रक्रियेच्या बाजूने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पूर्वी टेंडरमुक्त कामांची भूमिका मांडणाऱ्यांनी आता भूमिका बदलल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. “मुख्याधिकारी नसल्यावर आम्ही कोणाशी भांडायचे?” असा विरोधकांचा प्रश्न चुकीचा असून, अधिकाऱ्यांशी वाद न घालता चर्चेतून प्रश्न सोडवणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. सभेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा अधिकार पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष यांना असतो, हेही त्यांनी अधोरेखित केले. काहींच्या भूमिकेमुळे नगरपालिकेचे नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जनहिताचे ठराव मंजूर करण्यासाठी सत्ताधारी नगरसेवक तयार असून, त्यासाठी विरोधकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले. शहरातील नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रलंबित लाईट बिल भरण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
“मी महिला अध्यक्ष आहे म्हणून त्रास देण्याचा प्रयत्न करू नये. गरज पडल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, जनतेने ज्यासाठी निवडून दिले आहे, त्या विश्वासाला पात्र ठरवत सर्वांनी जबाबदारीने काम करावे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
