तुळजापूर (प्रतिनिधी)-   महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी  मातेचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजाभवानी मंदिर  परिसराचा कायापालट करण्यासाठी 1800 कोटी रुपयांचा भव्य विकास आराखडा आता वेगाने राबवला जाणार आहे. या कामांचा दर आठवड्याला आढावा घेतला जाणार असून, पुढील 15 दिवसांत सर्व विभागांकडून कालबद्ध (टाईम-बाउंड) आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशी माहिती आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन दिले.

 यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पाटील म्हणाले की, भाविकांच्या सोयीसाठी उभारण्यात येणाऱ्या भक्त सुविधा केंद्रांच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नियोजनानुसार भाविकांना महाद्वारातून प्रवेश करून थेट दर्शन मंडपात पोहोचता येणार आहे. दर्शन मंडपाचे काम भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक असले तरी त्याचे डिझाइन व तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वृद्ध व दिव्यांग भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत महाद्वाराजवळ मोठी लिफ्ट उभारली जाणार आहे. या लिफ्टमधून खाली उतरल्यावर भुयारी मार्ग (टनेल) द्वारे थेट मंदिराजवळ पोहोचण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. हे महत्त्वाचे काम 6 ते 9 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

तुळजापूरच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी रामदरा तलाव परिसरात 108 फूट उंचीचा भव्य पुतळा, अद्ययावत वस्तुसंग्रहालय (म्युझियम), बोटिंग सुविधा, आकर्षक बगीचा विकास, या सर्व कामांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तुळजापूर शहराचा विकास केवळ आजचा न राहता पुढील 50 वर्षांचा विचार करून ‌‘अर्बन प्लॅनिंग‌’द्वारे मास्टर प्लॅन तयार केला जात आहे. असे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष विनोद गंगणे,आनंद कंदले, औदुंबर कदम उपस्थित होते.


 
Top