धाराशिव (प्रतिनिधी)-  तालुक्यातील उपळा (मा) येथील प्रमोद मनोज अवधूते (वय 23) याच्या अत्यंत संशयास्पद मृत्यू प्रकरणी नातेवाईकांनी प्रेतासह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. या प्रकरणी  ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करावी, अशी न्याय मागणी आंदोलकांनी केली. रिपाइं (आ) चे प्रदेश जॉइंट सेक्रेटरी राजाभाऊ ओहाळ यांनी यंत्रणेला जाब विचारला. त्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक शफकत आमना यांनी वरिष्ठांना याबाबत अवगत केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी आंदोलकांना कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा रास्ता रोको स्थगित करण्यात आला. 

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 11 एप्रिल) रात्री सुमारे नऊच्या सुमारास प्रमोद अवधूते यास शेतात कामासाठी मनोज पडवळ घेऊन गेले होते. त्यानंतर रविवारी सकाळी प्रमोदने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पडवळ यांनी कुटुंबीयांना दूरध्वनीद्वारे दिली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविला. तेथे शव विच्छेदन करण्यात आले.

दरम्यान, हा आत्महत्येचा प्रकार नसून प्रमोदला अमानुष मारहाण करून त्याचा खून करण्यात आला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह झाडाला टांगण्यात आल्याचा गंभीर आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. प्रमोद हा मागासवर्गीय कुटुंबातील असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

या घटनेच्या निषेधार्थ नातेवाईकांनी मृतदेह थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आणत ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाकडून तत्काळ कारवाई न झाल्याने संतप्त नातेवाईकांनी दोन तास रास्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला. यावेळी स्थानिक राजकीय पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top