धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होत असून हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार एप्रिल व मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत उष्माघाताच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजनांबाबत सूचना देण्यात आल्या.तसेच सर्व आरोग्य संस्थांना नागरिकांना योग्य उपचार उपलब्ध करून देणे आणि उष्माघातासंदर्भात आवश्यक आरोग्य शिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले.
सार्वजनिक आरोग्य विभाग,जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील 5 ग्रामीण रुग्णालये,6 उपजिल्हा रुग्णालये, 44 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 2 शहरी आरोग्य केंद्रांमध्ये ‘कोल्ड रूम’ची व्यवस्था करण्यात आली आहे.उष्माघाताच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच उष्माघात प्रतिबंधासाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स स्थापन करण्यात आली असून सर्व आरोग्य संस्थांना प्रसिद्धी साहित्य वितरित करण्यात आले आहे.
उष्माघातापासून बचावासाठी पुढील उपाय अवलंबा
हे करा
पुरेसे पाणी प्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा,हलक्या वजनाचे व फिकट रंगाचे सैलसर कपडे वापरा. उन्हात बाहेर पडताना गॉगल,छत्री व पादत्राणांचा वापर करा.डोक्यावर टोपी किंवा हॅटखाली ओलसर कपडा ठेवा.पाळीव प्राण्यांना सावलीत व थंड ठिकाणी ठेवा. घरात ओलसर पडदे, पंखा किंवा कुलरचा वापर करून वातावरण थंड ठेवा.
हे करू नका
शक्यतो दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळा.कष्टाची कामे उन्हात करू नका.पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुलांना ठेवू नका.गडद रंगाचे व तंग कपडे वापरू नका.उष्णतेच्या काळात स्वयंपाक टाळा व स्वयंपाकघर हवेशीर ठेवा.मद्य, चहा,कॉफी व सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन टाळा.अतिप्रथिनयुक्त व शिळे अन्न खाऊ नका.
उष्माघाताची लक्षणे
उष्माघाताची लक्षणे प्रौढ व लहान मुलांमध्ये वेगवेगळी दिसून येतात.
प्रौढांमध्ये : शरीराचे तापमान 104 फॅरेनहाइट (40) पर्यंत वाढणे, तीव्र डोकेदुखी, स्नायू आखडणे, मळमळ, उलटीचा भास, अस्वस्थता, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे व धडधडणे.
लहान मुलांमध्ये : आहार घेण्यास नकार, सतत चिडचिड, लघवीचे प्रमाण कमी होणे, डोळे शुष्क होणे, तोंड कोरडे पडणे, रक्तस्त्राव होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
शरीराचे तापमान वाढलेले,व्यक्ती बेशुद्ध,गोंधळलेली किंवा अतिप्रमाणात घाम येत असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 108 किंवा 102 वर संपर्क साधावा. जिल्ह्यातील नागरिकांनी उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नये. उष्माघाताचे गंभीर परिणाम होऊ शकतात.त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेऊन सुरक्षित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी केले आहे.