धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सन 2025-26 या कालावधीत प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवत शिक्षण क्षेत्रात आदर्शवत कामगिरी नोंदवली आहे.
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत जिल्ह्यातील शाळांसाठी 204 नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम तसेच 114 मुला-मुलींसाठी स्वच्छतागृह बांधकामासाठी एकूण 3,362.80 लक्ष रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित,सुसज्ज आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध होत आहेत.शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळावी या उद्देशाने जिल्ह्यातील 200 दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांप्रमाणे एकूण 40 लक्ष रुपयांचा लाभ किसान विकास पत्राच्या स्वरूपात जिल्हा स्वानिधीतून देण्यात आला असून हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे संवेदनशील उदाहरण ठरत आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी जिल्हा परिषदेकडून स्वसंपादित निधीतून इयत्ता 5 वी व 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षांसाठी दरवर्षी दोन सराव परीक्षांचे आयोजन करण्यात येत आहे.या दूरदृष्टीपूर्ण निर्णयामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांच्या प्रमाणात सरासरी 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.तसेच नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रियेतही जिल्हा परिषद शाळांनी उल्लेखनीय यश मिळवले असून एकूण 80 पैकी 67 विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच प्रवेश वाढीसाठी शिक्षण विभागाने सुरू केलेला ‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ हा अभिनव उपक्रम राज्यभरात आदर्श ठरला असून राज्य शासनाने त्याची दखल घेत संपूर्ण महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. पायाभूत सुविधा,गुणवत्ता, समावेशकता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून धाराशिव जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षण क्षेत्रात मानवी मूल्ये जपत प्रगतीची नवी दिशा निर्माण केली आहे.