धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राने उल्लेखनीय प्रगतीची नोंद करत शालेय स्पर्धा,आधुनिक क्रीडा सुविधा आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या क्रीडा विकासाला नवी दिशा दिली आहे. सन 2025-26 या वर्षात जिल्हा क्रीडा परिषदेमार्फत तालुकास्तरावर 10 खेळ, जिल्हास्तरावर 93 खेळ आणि विभागस्तरावर 13 खेळांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सन 2022-23 पासून शालेय क्रीडा स्पर्धांची संपूर्ण कार्यपद्धती ऑनलाईन करण्यात आली असून प्रमाणपत्र वितरणही डिजिटल स्वरूपात केले जात आहे.

यावर्षी जिल्ह्यातील 666 शाळांमधील तब्बल 44 हजार 335 खेळाडूंनी शालेय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून क्रीडाप्रती वाढती आवड सिद्ध केली आहे. दि.23 ते 26 मार्च 2026 या कालावधीत तालुका क्रीडा संकुल, कळंब येथे आयोजित राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत राज्यातील 8 विभागांमधून 625 खेळाडूंनी सहभाग घेत जिल्ह्याच्या क्रीडा व्यवस्थापन क्षमतेची प्रचिती दिली. जिल्हा क्रीडा संकुल योजनेअंतर्गत श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,धाराशिवसाठी 1 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक व नॅचरल ग्रास फुटबॉल मैदान उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.

जिल्हा नियोजन समितीमार्फत बॅडमिंटन हॉल अद्ययावतीकरणासाठी 150.49 लक्ष आणि वुडन फ्लोअरिंगसाठी 195.13 लक्ष निधी मंजूर करण्यात आला असून ही कामे वेगाने सुरू आहेत. जलतरण तलाव अद्ययावतीकरणाचाही प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. तालुका क्रीडा संकुल योजनेंतर्गत भूम, जेवळी, कळंब, तुळजापूर आणि गुंजोटी येथे बहुउद्देशीय इनडोअर हॉल, ट्रॅक, मैदान, प्रशासकीय इमारती, पायाभूत सुविधा आणि इतर विकासकामे प्रगतीपथावर आहेत. विविध तालुक्यांमध्ये मंजूर निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आधुनिक क्रीडा सुविधा उभारल्या जात असून ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार संधी उपलब्ध होत आहेत.

क्रीडा स्पर्धांबरोबरच जय शिवाजी पदयात्रा,आंतरराष्ट्रीय योग दिन, जागतिक ऑलिम्पिक डे, हर घर तिरंगा रॅली, राष्ट्रीय क्रीडा दिन, क्रीडा सप्ताह आणि जिल्हास्तरीय युवा महोत्सव अशा विविध उपक्रमांच्या आयोजनातून क्रीडा संस्कृतीला व्यापक सामाजिक स्वरूप प्राप्त झाले आहे.धाराशिव जिल्ह्यातील क्रीडा विभागाच्या या सर्वसमावेशक आणि दूरदृष्टीपूर्ण उपक्रमांमुळे जिल्हा केवळ स्पर्धात्मक क्रीडेतच नव्हे,तर सक्षम,आधुनिक आणि प्रेरणादायी क्रीडा विकासाच्या दिशेने प्रभावीपणे वाटचाल करत आहे.


 
Top