तुळजापूर (प्रतिनिधी)- गेल्या सुमारे 15 वर्षांपासून नादुरुस्त अवस्थेत असलेला आपसिंगा येथील सरदारा साठवण तलाव लवकरच दुरुस्त होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अमीर शेख यांनी दिली आहे. तलाव दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी मंजुरीच्या हालचाली सुरू झाल्या असून, स्थानिक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात परिसरातील इतर तळी भरून वाहतात, मात्र सरदारा साठवण तलाव नादुरुस्त असल्यामुळे कोरडाच राहतो. त्यामुळे परिसरातील शेती आणि पाणी साठवण व्यवस्थेवर मोठा परिणाम होत होता. या तलावाच्या दुरुस्तीसाठी अमीर शेख यांनी गेल्या चार-पाच वर्षांपासून जिल्हा जलसंधारण अधिकारी, धाराशिव ते मंत्रालय स्तरापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. अखेर 29 तारखेला मंत्रालयात जाऊन आमदार राणा पाटील यांच्या माध्यमातून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात निधी मागणीचे पत्र सादर करण्यात आले हा विषय गांभीर्याने घेतल्याने तलाव दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
100 हेक्टर शेतीला फायदा
तलाव दुरुस्त झाल्यानंतर परिसरातील 100 हेक्टरपेक्षा अधिक शेतीला पाणी उपलब्ध होणार आहे. याशिवाय पाळीव आणि वन्य प्राण्यांसाठीही पाण्याची सोय होणार असल्याने पर्यावरणीय दृष्ट्याही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या तलाव दुरुस्तीला अखेर गती मिळाल्याने आपसिंगा परिसरातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
