तुळजापूर (प्रतिनिधी)-  बुधवारी झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत भोगवटादार वर्ग-2 मधील जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी अधिमूल्याची पुनर्रचना करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील तसेच धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतकरी वर्गातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

या संदर्भातील सविस्तर अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार असून, त्यात नेमक्या अटी व सवलती काय असतील याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, 7 ऑगस्ट 2025 रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे धाराशिव दौऱ्यावर आले असताना शेतकऱ्यांनी भोगवटादार वर्ग-2 मधील जमिनी वर्ग-1 मध्ये रूपांतरित करण्याची मागणी केली होती. विकास जाधव पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले होते. सुमारे सहा महिन्यांनंतर या मागणीची दखल घेत निर्णय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, कमाल जमीन धारणा मर्यादा कायद्यानुसार भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप झालेल्या जमिनी अद्याप भोगवटादार वर्ग-2 मध्ये असल्याने संबंधित शेतकरी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित होते. पिक विमा, अनुदान, शेती अवजारे, बी-बियाणे, खते तसेच कर्जसुविधा यांचा लाभ त्यांना मिळत नव्हता. तुळजापूर तालुक्यात सुमारे 4 हजार हेक्टर जमीन भूमिहीन व गरजू कुटुंबांना वाटप करण्यात आली असून, सुमारे 10 हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह या जमिनीवर अवलंबून आहे. मात्र, शासकीय लाभ न मिळाल्याने या जमिनींचा अपेक्षित फायदा होत नव्हता.

 
Top