धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना केशेगाव, येथे नुकतीच येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने भेट दिली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही.माने, अकॅडमिक डीन आणि मेकॅनिकल इंजीनियरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. डी. डी. दाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल आयोजित करण्यात आली होती. या शैक्षणिक सहलीमध्ये द्वितीय व तृतीय वर्गातील विद्यार्थ्यांचा व प्राध्यापकांचा विशेष सहभाग होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना, केशेगाव येथे विद्यार्थ्यांनी साखर निर्मिती प्रकल्प, पारंपारिक ऊर्जा प्रकल्प को-जनरेशन प्रकल्प डिस्टिलरी प्रकल्प यांची माहिती घेतली. भेटी दरम्यान विविध मशिनरी आणि प्रोसेस संदर्भात कारखान्याचे इंजिनियर अनिकेत भोरे व इंजिनियर सुरवसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याच दरम्यान केशेगाव येथीलच सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पास भेट देऊन अपारंपारिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची माहिती घेतली. यावेळी कारखान्याचे इंजिनियर जगदाळे यांनी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची माहिती दिली.
सहली संदर्भात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माने म्हणाले की, सौर ऊर्जा हे अपरंपारिक ऊर्जा स्तोत्र असून याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सौर ऊर्जा निर्मिती हा आपल्या भागातील एकमेव स्त्रोत आहे. येणाऱ्या काळात अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताचा व्यवस्थित वापर करणारा देशच पुढे जगाचे नेतृत्व करू शकतो आणि महाविद्यालयाचा मेकॅनिकल विभाग हा त्यासंदर्भात लागणाऱ्या सुख सुविधांनी परिपूर्ण असून येणाऱ्या काळात औद्योगिक क्षेत्रात मेकॅनिकल ब्रँचचां दबदबा राहील. विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक सहलीचे नियोजन प्रा. आर डी गुरव, प्रा. टेकाळे पाटील, प्रा. एस पी बिरादार, प्रा. एस डी शिंदे व विराज पाटील यांनी केले.
