धाराशिव (प्रतिनिधी)- विश्वभूषण, बोधिसत्व, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.22) सायंकाळी पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आला. मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती आणि महाराज, भन्तेजी, मौलानांसह अठरापगड जाती-धर्मातील नागरिकांच्या सहभागाने मिरवणुकीचा उत्साह अधिकच वाढला.
शहरातील क्रांती चौक भीमनगर येथे जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, जयंती समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे, समितीचे अध्यक्ष तथा सांजा गावचे सरपंच प्रवीण सूर्यवंशी, कार्याध्यक्ष सुधीर पवार, विशाल शिंगाडे, जातमुक्त गाव करणारे सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे पाटील, मसूद शेख ॲड.परवेज काझी, पंकज काटे, सुनील भराडीया, मौलाना अय्युब कासमी, मौलाना मुफ्ती रहेमतुल्ला, मौलाना जाफर खानसाब, मौलाना सजीयोद्दीन शेख, मौलाना कारी कलीमसाब, भन्ते सुमेधजी नागसेन, भन्ते कमल धम्मो, भन्ते संघदूत, भन्ते विनीत धम्म, भन्ते सुमित बोधी, हभप प्रकाश बोधले महाराज, हभप धनंजय महाराज सांजेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील यांचा शाल, पुष्पहार व सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान उपस्थित मौलाना, भन्तेजी, महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. तर सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे पाटील, अधीक्षक अभियंता संजय आडे यांचा सत्कार समितीच्या वतीने करण्यात आला. प्रास्ताविक समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले. तर आभारप्रदर्शन समितीचे कार्याध्यक्ष सुधीर पवार यांनी केले.
अन्यायाची जाणीव झाली तर अन्याय दूर होईल - मनोज जरांगे पाटील
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्माचा आदर केला. त्यांच्याच विचाराचा वारसा घेऊन मी समाजासाठी मैदानात उतरलो आहे. समाजातील सर्व घटकांमी आपल्यावरील अन्यायाची जाणीव झाली पाहिजे. त्यासाठी संघर्ष केला तर अन्याय दूर होईल. आपल्यावर झालेल्या अन्यायाला दूर करायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लढ्याची जाणीव आपण करून घ्यावी.

