धाराशिव (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वर्षातून किमान 100 दिवसांचा हमी रोजगार उपलब्ध करून देणे,तसेच आर्थिक स्थैर्य निर्माण करत गावांचा सर्वांगीण विकास साधणे हा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) योजनेचा मुख्य उद्देश आहे.या योजनेमुळे केवळ रोजगारच मिळत नाही,तर जलसंधारण, वृक्षारोपण,रस्ते,शेती विकास यांसारख्या कामांद्वारे ग्रामीण भागाची प्रगतीही साधली जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागाच्या माध्यमातून ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून,हजारो कुटुंबांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण 3 लक्ष 71 हजार 477 कुटुंबे जॉब कार्डसाठी नोंदणीकृत असून,त्यापैकी सन 2025-2026 मध्ये 49 हजार 706 नवीन नोंदणी केलेल्या कुटुंबांना जॉबकार्ड वाटप करण्यात आले आहे.सन 2025-2026 मध्ये जिल्ह्याला एकूण 23.25 लक्ष मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.त्यानुसार 24.56 लक्ष मनुष्यदिवस निर्मिती करून 105.69 टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य करण्यात आली आहे. याच कालावधीत जिल्ह्यात 59 हजार 198 कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून,त्यापैकी 4 हजार 942 कुटुंबांनी 100 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी मनरेगाअंतर्गत काम केले आहे.या योजनेअंतर्गत सध्या जिल्ह्यात एकूण 27 हजार 369 कामे प्रगतीपथावर असून,विविध विकासकामांमुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत होत आहेत.
सन 2025-2026 मध्ये मनरेगा अंतर्गत जिल्ह्यात एकूण 145 कोटी 92 लक्ष रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यापैकी 72.94 कोटी रुपये अकुशल कामांवर,तर 71.24 कोटी रुपये कुशल कामांवर खर्च करण्यात आले आहेत. मनरेगा योजनेमुळे आज अनेक कुटुंबांना स्थलांतर टाळता आले आहे.हाताला काम मिळाल्याने उत्पन्नात वाढ झाली असून, कुटुंबांच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे.कष्टातून मिळणारा हा रोजगार केवळ उदरनिर्वाहाचा आधार नसून,ग्रामीण भागातील आत्मविश्वास आणि स्वाभिमान वाढवणारा ठरत आहे.जिल्ह्यात या योजनेची यशस्वी अंमलबजावणी होत असून “काम हवे,तर काम मिळेल” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरून ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळत आहे.