भूम (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलीचे गुपचूप लग्न उरकण्याच्या तयारीत असताना प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे एक गंभीर बालविवाह टळल्याची घटना बुधवारी भूम तालुक्यात घडली. मौजे आष्टा येथे 13 वर्षीय बालिकेचा विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच संबंधित यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा बाल संरक्षण कक्ष धाराशिव तसेच चाईल्ड हेल्पलाइन 1098 यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. मात्र, पथक पोहोचण्यापूर्वीच संबंधित बालिकेचे आई-वडील तिला घेऊन पसार झाल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले. यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने शोधमोहीम सुरू ठेवत परिसरात चौकशी केली असता बालिकेला सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथे नेले जात असल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे तात्काळ बालकल्याण समिती, सोलापूर यांच्याशी समन्वय साधण्यात आला. दरम्यान, संबंधित पालकांशी सातत्याने फोनवर संपर्क साधून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
प्रशासनाच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आणि पालकांनी बालिकेसह परत येण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर बालिकेला ताब्यात घेऊन बालकल्याण समिती धाराशिव यांच्या आदेशानुसार धाराशिव येथील बालाजी नगर परिसरातील ‘शक्ती सदन’मध्ये तात्पुरता निवारा देण्यात आला आहे. सध्या बालिकेच्या सुरक्षिततेची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. या कारवाईदरम्यान ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील प्रज्ञा बनसोडे, चाईल्ड हेल्पलाइन 1098चे अभय काळे व पल्लवी पाटील, बिट अंमलदार तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, बालविवाह हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनीही अशा घटना आढळल्यास तात्काळ चाईल्ड हेल्पलाइन 1098 वर माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.