तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर परिसरात सध्या लग्नसराईची धामधूम सुरू असून या विवाहसोहळ्यांना एक वेगळाच “शिवमय” रंग चढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी लग्नाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूजनाने आणि आरतीने होत असल्याने हा नवा ट्रेंड चर्चेचा विषय ठरत आहे.
ग्रामीण भागात विशेषतः नवदांपत्याच्या हस्ते प्रथम शिवरायांचे पूजन करून आरती केली जाते आणि त्यानंतरच मुख्य विवाह विधींना प्रारंभ होतो. यावेळी डिजिटल स्क्रीनवर शिवरायांचे फोटो प्रदर्शित केले जातात, तर वऱ्हाडी मंडळी टाळ्यांच्या गजरात आरतीत सहभागी होताना दिसतात. या पार्श्वभूमीवर नवविवाहित जोडपी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात शिवरायांच्या प्रेरणेने करत असल्याची भावना व्यक्त करत आहेत. आरतीनंतर नवदांपत्य प्रथम शिवाजी महाराजांना वंदन करून आई-वडील आणि उपस्थित ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत असल्याने “ज्येष्ठांचा सन्मान” ही परंपराही अधिक बळकट होताना दिसते.
रविवार, 26 एप्रिल रोजी सुरतगाव येथे युवराज विश्वंभर कदम यांचे चिरंजीव सचिन यांचा विवाह अमृता यांच्यासोबत पार पडला. या विवाहसोहळ्याची सुरुवातही शिवाजी महाराजांच्या आरतीने करण्यात आली, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली. एकूणच, लग्नसोहळ्यांमध्ये शिवरायांच्या आरतीचा वाढता समावेश हा सांस्कृतिक अभिमान आणि प्रेरणादायी परंपरेचे प्रतीक मानला जात आहे. मात्र, काही जाणकारांच्या मते इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान राखताना त्यांना देवत्व देण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे पालन करणे अधिक महत्त्वाचे आहे.
