कळंब (प्रतिनिधी)- शहरातील ढोकी रोडवरील बस स्थानकाजवळ महावितरणच्या रोहित्रीतील ट्रान्सफॉर्मरला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ट्रान्सफॉर्मरमधून गरम ऑइल बाहेर पडताच काही क्षणांतच आगीने विकराळ रूप धारण केले. यामुळे बसस्थानकात बसलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली.
घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. लाईनमनने पाण्याच्या व्हॉल्वमधील पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महावितरणच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील अनेक ठिकाणी असलेल्या रोहित्रींची वर्षानुवर्षे योग्य देखभाल होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक ट्रान्सफॉर्मर उघड्यावर असून त्यांना कोणतीही संरक्षक जाळी नसल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ट्रान्सफॉर्मरजवळ कचरा टाकू नये
महावितरणचे सहाय्यक अभियंता सौरभ टाखरखेडे यांनी सांगितले की, “उन्हाळ्यामुळे वीजेचा लोड वाढला असून उष्णतेमुळे ट्रान्सफॉर्मर गरम होतात. सर्व रोहित्रींवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनीही ट्रान्सफॉर्मरजवळ कचरा टाकू नये, कारण कचऱ्याला आग लागूनही अशा घटना घडू शकतात.”नागरिक शुभम राखुंडे यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, “ट्रान्सफॉर्मरला आग लागणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. नियमित देखभाल झाली असती तर ही घटना टळली असती.”जवळच बस स्टॉप आहे मोठा अनर्थ टाळला.
