कळंब (प्रतिनिधी)- उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कळंब बस आगारातून जालना व पुणे मार्गावर हंगामी ज्यादा गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. अशी माहिती आगार प्रमुख विजयकुमार घोलप यांनी दिली.

त्यांच्या माहितीनुसार, कळंब आगारातून दररोज सकाळी 6 वाजता जालना तसेच सकाळी 6 वाजता पुणे (स्वारगेट) या मार्गावर बस सोडण्यात येत आहे. याशिवाय संध्याकाळी साडेआठ वाजता वल्लभनगर, पुणे मार्गावरही हंगामी गाडी सुरू करण्यात आली आहे. या गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मात्र, छत्रपती संभाजीनगर मार्गे गंगापूर तसेच येरमाळा मार्गे अक्कलकोट या महत्त्वाच्या मार्गांवरील बससेवा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत असून, या गाड्या लवकरात लवकर सुरू कराव्यात, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून होत आहे.

तसेच, कळंब-नांदेड-शिवाजीनगर (पुणे) औंधगाव मार्गे डांगे चौक-वल्लभनगर या पूर्वी सुरू असलेल्या बससेवेचेही पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी पुढे येत आहे.


बसअभावी नवीन गाड्यांना ब्रेक

आगार प्रमुख विजयकुमार घोलप म्हणाले की, “कळंब आगारातून आणखी चार ते पाच मार्गांवर ज्यादा गाड्या सुरू करण्याचा मानस आहे. मात्र सध्या बसची उपलब्धता कमी असल्यामुळे नवीन गाड्या सुरू करता येत नाहीत. भविष्यात जशा गाड्या उपलब्ध होतील, त्यानुसार अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, नांदेड, अक्कलकोट आदी मार्गांवर अतिरिक्त बससेवा सुरू करण्यात येईल. प्रवाशांनी शक्यतो एसटी बसनेच प्रवास करावा,” असे आवाहन त्यांनी केले.

 
Top