तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील मंदिर महाद्वार रोडवर झालेल्या मोठ्या अतिक्रमणांमुळे श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार पूर्वी दृष्टीस पडत नव्हते. मात्र गुरुवारी शुकवार शनिवार नगरपरिषदेकडून राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे आता महाद्वार कमान भाविकांना स्पष्टपणे दिसू लागली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
महाद्वार परिसर, शुक्रवार पेठ, भवानी रोड आणि महाद्वार रोड या मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गांवरील अतिक्रमणे हटविण्यात आल्याने अरुंद झालेले रस्ते पुन्हा रुंद झाले आहेत. तसेच श्री तुळजाभवानी राजमाता शहाजी महाद्वार लगत असलेले अतिक्रमणिक दुकाने हे पाडले. यामुळे भाविकांना मंदिराकडे जाणे सुलभ झाले असून गर्दीतून मार्गक्रमण करणे सोपे झाले आहे. दीर्घकाळ अतिक्रमणांमुळे या भागातील वाहतूक आणि भाविकांची गैरसोय वाढली होती. आता कारवाईनंतर परिसर मोकळा झाल्याने नागरिकांनी आणि भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. तथापि, भविष्यात पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी नगरपरिषदेकडून अशाच प्रकारची सातत्यपूर्ण व कायमस्वरूपी कारवाई राबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
