धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (दि. 12 मे) धाराशिव प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक ॲड. व्यंकटराव गुंड यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी कार्यकर्ते व नागरिकांकडून होत आहे.
पाडोळी (आ.) या गावातून उभा राहिलेला गुंड परिवार गेल्या चार दशकांपासून सामाजिक, औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रात प्रभावी कामगिरी करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेले ॲड. गुंड यांनी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांसारख्या संघटनांमध्येही सक्रिय काम केले आहे. ते प्रथम व द्वितीय वर्ग शिक्षित स्वयंसेवक असून, 1977 साली पुणे येथे प्रथम वर्ग तर 1984 साली नाशिक येथील केटिएचएम महाविद्यालयात द्वितीय वर्ग स्वयंसेवक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
गुंड कुटुंबाची राजकीय परंपरा देखील उल्लेखनीय आहे. त्यांच्या ज्येष्ठ बंधूंनी अनेक वर्षे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य व उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांनीही सरपंच, जिल्हा परिषद सदस्य व सहकारी संस्थांमध्ये विविध पदांवर काम करत विकासकामांना चालना दिली आहे. स्वतः ॲड. व्यंकटराव गुंड यांनीही सरपंच तसेच गृहरक्षक दलाच्या जिल्हा समादेशक पदावर कार्य करत प्रशासनिक अनुभव मिळवला आहे.
औद्योगिक क्षेत्रात त्यांनी उभारलेला रूपामाता उद्योग समूह आज परिसरातील शेतकरी, कामगार व बेरोजगारांसाठी आधारवड ठरत आहे. ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे मानले जाते.धाराशिव लोकसभा मतदारसंघात ॲड. गुंड यांचा मोठा जनसंपर्क असून, स्थानिक पातळीवर त्यांची मजबूत पकड आहे. पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि दीर्घ अनुभव लक्षात घेता विधानपरिषदेवर त्यांना संधी देण्यात यावी, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून विधानपरिषदेसाठी होणाऱ्या निवड प्रक्रियेत ॲड. व्यंकटराव गुंड पाटील यांच्या नावाचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.