धाराशिव (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचे औचित्य साधून धाराशिव नगरीत क्रांतीच्या सुरांचा अभूतपूर्व सोहळा रंगला. महाराष्ट्राचा लाडका गायक आदर्श शिंदे यांच्या बुलंद आणि थरारक आवाजाने संपूर्ण जिल्हा परिषद मैदान दणाणून गेले. निमित्त होते, आमदार राणाजगजितसिंह पाटील व जिल्हा परिषदेच्याअध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या प्रेरणेतून मल्हार पाटील आणि साक्षी मल्हार पाटील यांनी आयोजित केलेल्या भीम महोत्सवाचे.
कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली. आदर्श शिंदे यांनी आपल्या पहाडी आवाजात भीमगीते सादर करताच, हजारोंच्या संख्येने उपस्थित भीम अनुयायांनी जय भीमचा जयघोष केला. प्रत्येक गीतातून मिळणारी प्रेरणा आणि समतेच्या विचारांनी उपस्थितांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित केली. हा केवळ संगीताचा कार्यक्रम न ठरता, समाज परिवर्तनाचा एक जिवंत जागर ठरला. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे भाजप युवा नेते मल्हार पाटील यांचा सक्रिय सहभाग. लेडीज क्लबच्या माध्यमातून आजवर अनेक कार्यक्रम झाले, मात्र मल्हार व डॉ. साक्षी पाटील यांच्या पुढाकारातून प्रथमच एवढ्या भव्य दिव्य स्वरूपात भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यांच्या या पहिल्याच प्रयत्नाला धाराशिवकरांनी उदंड प्रतिसाद देत हा सोहळा यशस्वी केला. कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांच्या गर्दीने मैदान फुलून गेले होते. “प्रत्येक शब्दात अभिमान आणि प्रत्येक ठेक्यात क्रांती“ असा अनुभव घेत तरुणाईने या गीतांवर ताल धरला. जिल्ह्याच्या सांस्कृतिक इतिहासात हा कार्यक्रम एक मैलाचा दगड ठरला असून, बाबासाहेबांच्या विचारांचे नवचैतन्य या माध्यमातून घराघरात पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
