धाराशिव (प्रतिनिधी)- महिलांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीचा कणा असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) धाराशिव जिल्हा कार्यालयाने 2025-26 या वर्षात राज्यात दुसरा क्रमांक पटकावून नवा इतिहास रचला आहे. सन मागील 29 वर्षांत पहिल्यांदा सांघिक कामगिरीच्या जोरावर माविमने ही मोठी झेप घेतली आहे. यामुळे जिल्ह्याचा महिला. सक्षमीकरणाचा नवा पॅटर्न आता राज्यासमोर आला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
बचतगटांना आर्थिक बळ देण्यासाठी माविमने यंदा 37 कोटी 21 लक्ष रुपयांचे बँक कर्ज उपलब्ध करून दिले. विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 10 कोटींनी अधिक कर्जवाटप झाले आहे. याशिवाय व्हल्नरेबल सपोर्ट फंडच्या माध्यमातून विधवा, परित्यक्ता, दिव्यांग व अल्पभूधारक अशा 512 गरजू महिलांना 76 लक्ष 80 हजार रुपयांची थेट आर्थिक मदत देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणले आहे. कुक्कुटपालन, शेळीपालन, दाल मिल आणि हळद प्रक्रियेसारख्या उपप्रकल्पांमध्ये जिल्ह्याने 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जिल्ह्यात नव्याने तीन महिला शेतकरी उत्पादक कंपन्या आणि ‘लाडकी बहिण’ महिला सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आली आहे. या माध्यमातून महिला आता केवळ बचत न करता उद्योजक बनण्याकडे यशस्वीपणे वाटचाल करत आहेत.केवळ आर्थिकच नव्हे, तर आरोग्य क्षेत्रातही माविमने ठसा उमटवला आहे. जिल्ह्यातील 64 गावांतील 4,960 महिलांची हिमोग्लोबिन, रक्तदाब व मधुमेह तपासणी.
आणि 3,000 हून अधिक महिलांना बियाणे वाटप करून पोषण आहार चळवळ राबविण्यात आली आहे. माविम मित्र मंडळ स्थापन करून 60 गावांतील पुरुषांना स्त्री-पुरुष समानता व महिलांच्या मालमत्ता हक्काबाबत प्रशिक्षित करण्यात आले.
