तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मंदिर येथे सुरू असलेल्या जीर्णोद्धार कामांना आता वेग आला असून, भवानी-शंकर मंडपाच्या उभारणीसाठी भूमीची तांत्रिक तपासणी (कोर बोर) पूर्ण करण्यात आली आहे.

मंदिर संस्थानच्या वतीने सुरू असलेल्या कामांअंतर्गत भवानी-शंकर मंडप परिसरात पितळी दरवाजासमोर आणि मंडपाच्या पाठीमागील भागात विशेष यंत्राद्वारे तपासणी करण्यात आली. या प्रक्रियेत 2 इंची पाईपच्या साहाय्याने सुमारे 10 मीटर खोलीपर्यंत जमिनीची तपासणी करण्यात आली. ज्यामुळे त्या भागातील भूगर्भीय स्थितीचा सखोल अभ्यास करण्यात आला. भाविकांच्या गर्दीमुळे रात्री हे काम केले जात आहे. या तपासणीनंतर आता मंडपाच्या पायाची रचना कशी असावी, किती खोलीपर्यंत पाया घ्यावा, याबाबत तांत्रिक निर्णय घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे, मंदिरासारख्या ऐतिहासिक व धार्मिक स्थळावर काम करताना सुरक्षितता आणि टिकाऊपणा याला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे.

भूगर्भ तपासणी पूर्ण झाल्यामुळे आता भवानी-शंकर मंडपाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार असून, संपूर्ण जीर्णोद्धार प्रक्रियेला गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी  मातेच्या मंदिराचा ऐतिहासिक वारसा जपत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कामे केली जात आहेत. यामुळे मंदिराची भव्यता आणि सुरक्षितता दोन्ही वाढणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिर  येथे सुरू असलेल्या जीर्णोद्धार कामांमुळे भाविकांसाठी अधिक सुरक्षित आणि सुसज्ज व्यवस्था निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. भवानी-शंकर मंडपाच्या कामामुळे मंदिराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

 
Top