.

धाराशिव (प्रतिनिधी)- : पाडोळी (आ.) येथील अनियमित वीजपुरवठा व ट्रान्सफॉर्मर बिघाडाच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी रूपामाता फाऊंडेशनच्या वतीने उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले.

पुण्यपुरस्कार कार्यक्रमानिमित्त धाराशिव येथे आलेल्या उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन फाऊंडेशनचे सचिव तथा विश्व हिंदू परिषद उपाध्यक्ष धाराशिव अ‍ॅड.अजित व्यंकटराव गुंड-पाटील यांनी ग्रामस्थांच्या अडचणी मांडल्या. पाडोळी (आ.) गावामध्ये मागील काही दिवसांपासून अत्यंत अनियमित वीजपुरवठा होत असून वारंवार वीज खंडित होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी दीर्घकाळ वीज नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे.

वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. तसेच कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने घरगुती व शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांवर परिणाम होत असून नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

गावातील ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा संशय व्यक्त करून त्याची तात्काळ तपासणी व दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नियमित व सुरळीत वीजपुरवठा करण्याबाबतही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या समस्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास ग्रामस्थांच्या वतीने तसेच विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून महावितरण विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

 
Top