धाराशिव (प्रतिनिधी)-  उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव या कार्यालयात लवकरच परिवहन संवर्गातील वाहनांसाठी MH25BK ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे.वाहनांची नवीन मालिका सुरू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते.त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर ताण पडतो आणि अनेक वेळा नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो.हा त्रास कमी करण्यासाठी तसेच नागरिकांना त्यांना हवा असलेला आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक सुलभतेने मिळावा,यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

ज्या वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून घ्यायचे असतील त्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11.00 ते दुपारी 04.00 या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत.अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 5 (अ) नुसार पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत (उदा. आधार कार्ड,लाईट बिल, टेलिफोन बिल इ.) सादर करणे आवश्यक आहे.तसेच आकर्षक क्रमांकासाठी देय असलेल्या विहित शुल्काचा डी.डी.अर्जासह जमा करणे बंधनकारक आहे.डी.डी.हा केवळ बँकेचा असावा; इतर कोणत्याही नावाचे डी.डी.स्वीकारले जाणार नाहीत.तसेच डी.डी. व्यतिरिक्त बँकेने जारी केलेले बँकर्स चेक स्वीकारले जाणार नाहीत.डीडी किमान एक महिन्याच्या मुदतीचा असावा.


एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास त्यांची यादी कार्यालयीन नोटीस बोर्डावर लावण्यात येईल.यादीतील अर्जदारांना लिलाव प्रक्रियेसाठी अतिरिक्त रक्कमेचा डी.डी.सादर करावा लागेल.हा डी.डी.किमान रुपये 300/- पेक्षा कमी नसावा आणि तो केवळ “Deputy Regional Transport Officer, Dharashiv” यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेचा असावा.इतर कोणत्याही नावाचे डी.डी.स्वीकारले जाणार नाहीत.

अर्जदार किंवा त्यांच्या प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, धाराशिव यांच्या समक्ष सीलबंद लिफाफ्यातील डी.डी.उघडण्यात येतील.ज्या अर्जदाराने सर्वाधिक रकमेचा डी.डी.सादर केला असेल त्यास संबंधित पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. राखीव क्रमांक घेतल्यानंतर 6 महिन्यांच्या आत संबंधित वाहन नोंदणीसाठी सादर करणे आवश्यक आहे.अन्यथा तो क्रमांक आपोआप रद्द होईल आणि भरलेले शुल्क शासन जमा होईल.तसेच भरलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत किंवा समायोजित केली जाणार नाही.

आकर्षक क्रमांकासाठी अर्जाचा नमुना तसेच प्रतिनिधी येणार असल्यास आवश्यक प्राधिकारपत्राचा नमुना कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे.


वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

आकर्षक/पसंती क्रमांकासाठी अर्ज व डी.डी. स्वीकारणे : दि. 17 ते 21 एप्रिल, सकाळी 11 ते दुपारी 4 वाजता. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्जांची यादी प्रसिद्ध करणे : दि. 21 एप्रिल, सायंकाळी 5 वाजता पर्यंत.लिलावासाठी सीलबंद डी.डी. स्वीकारणे व उघडणे : दि. 22 एप्रिल, दुपारी 12 वाजतापर्यंत

नवीन MH25BK मालिकेसाठी इच्छुक नागरिकांनी वेळेत अर्ज करून पसंतीचा क्रमांक मिळवण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.


 
Top