तेर (प्रतिनिधी)- पोहायला गेलेल्या इसम पाण्यात बुडाल्याची घटना धाराशिव तालुक्यातील तेर येथे 24 एप्रिलला सकाळी बाराच्या दरम्यान घडली. पाण्यात बुडालेल्या इसमाचा शोध राज्य आपत्ती प्रतिसाद दल पथक कसून शोध घेत होते.त्यानतर इंदापूर येथील स्कूबा ड्रायव्हर पथकाला पाचारण केल्यानंतर 30 तासानंतर सायंकाळी सहाच्या दरम्यान मृतदेह सापडला.
धाराशिव तालुक्यातील तेर येथील अमरनाथ लक्ष्मण देवकुळे (वय 40) हे श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरातलगत असलेल्या तेरणा नदीच्या पात्रात पोहायला गेले असता तो पाण्यात बुडाला. पाण्यात बुडालेल्या इसमाचा पाण्यात जाळी टाकून हूडकण्याचा प्रयत्न करण्यात आला. तहसिलदार डॉ.मृणाल जाधव यांच्या आदेशाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक बोटीच्या सहाय्याने पाण्यात बुडालेल्या इसमाचा शोध घेतला. रात्र झाल्यामुळे तपास बंद करण्यात आला होता. 25 एप्रिलला सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. परंतु या पथकाला शोध लागला नाही. तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन दिली. यानतर इंदापूर येथील स्कूबा ड्रायव्हर पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने कांहीं वेळातच मृतदेहचा शोध घेतला. घटना घडल्यापासून तब्बल तीस तासांनंतर मृतदेह सापडला. घटनास्थळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट देऊन देवकुळे कुटूंबाचे सांत्वन केले. तहसिलदार डॉ.मृणाल जाधव, तेरचे ग्राम महसूल अधिकारी प्रशांत देशमुख, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब खोचरे,ढोकी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे, तेरच्या पोलीस पाटील फातेमा मनियार घटनास्थळी तळ ठोकूनच उपस्थित होते.
