तुळजापूर (प्रतिनिधी)- शांतीदूत तरुण मित्र मंडळ धोत्रीच्या आयोजित विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त मौजे धोत्री गावात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
डिजे व इतर वाद्य संगीत न लावता भीम गीताचे सादरीकरण करुन व आरोग्य शिबीर घेऊन महामानवाला अभिवादन करण्यात आले. धोत्री गावात अद्यापही कोणतेही जिल्हाधिकारी आले नाहीत. आज प्रथमच संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार हे गावात येऊन गावक-यांशी संवाद केला. अडीअडचणी समजून घेऊन त्यावरती अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी संबंधित विभागाला कळविले. गावातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, बसची सुविधा, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अभ्यासिका, वाचनालयासाठी संविधान सभागृह, हेमाडपंथी महादेव मंदिरासाठी आवश्यक सहकार्य, स्मशानभूमी सुरक्षित भिंती अशा प्रकारच्या समस्या गावक-यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे सांगुन लेखी निवेदन दिले. जिल्हाधिकारी यांनी सर्व बाबींचा समावेश करुन या गावाच्या विकासासाठी सातत्याने लक्ष राहिल असे मत व्यक्त केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धोत्री गावात प्रथमच जिल्हाधिकारी आल्याने गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत फटाके वाजवून व पुष्पवृष्टीने करण्यात आले. मानाचा तुरा असलेला फेटा बांधून शाल देऊन मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. यावेळी आलेल्या मान्यवरांचे स्वागत शांतीदुत तरुण मित्र मंडळ धोत्रीच्या वतीने करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, तहसिलदार, पोलीस निरीक्षक प्रदीप टेकाळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे, ॲड शांती कुमार कांबळे, जमीर शेख, विशाल घरबुडवे, सरपंच विद्यालता वेदपाठक, तलाठी, मंडळाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य,सह इतर मान्यवर उपस्थित होते. शांतीदुत तरुण मित्र मंडळ जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संकेत दत्ता मस्के, उपाध्यक्ष अजय मस्के, सचिव प्रसाद वडवराव, सल्लागार सहदेव मस्के, खजिनदार सुरज मस्के, विशाल मस्के, सतीश मस्के, दत्ता उबाळे सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
रामभाऊ मस्के यांनी सविस्तर माहिती देत जिल्हाधिकारी व आलेल्या मान्यवरांचे आभार मानले. शांतीदुत तरुण मित्र मंडळ धोत्रीच्या सर्व पदाधिकारींनी मेहनत घेऊन कार्यक्रम शांततेत यशस्वीपणे पार पाडला.
