भुम (प्रतिनिधी)-  शहरातील गोलाई चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या उभारणीवरून निर्माण झालेला वाद अखेर सामंजस्याने मिटवण्यात आला आहे. स्थानिक शिवप्रेमी व आंबेडकर अनुयायी यांच्या चर्चेनंतर दोन्ही महापुरुषांचे पुतळे एकाच परिसरात, शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या शेजारी स्वतंत्र जागांवर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. 14 मार्च रोजी गोलाई चौकात दोन्ही महान व्यक्तींचे पुतळे उभारण्यावरून मतभेद निर्माण झाले होते. या वादामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत विविध स्तरावर चर्चा, समन्वय व बैठका घेण्यात आल्या. दि. 23 एप्रिल रोजी अखेर सर्व संबंधित घटक शिवप्रेमी, आंबेडकर अनुयायी तसेच स्थानिक नागरिकांनी एकमताने तोडगा काढला. त्यानुसार गोलाई चौक परिसरातच शॉपिंग कॉम्प्लेक्स लगत योग्य अशा दोन स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आल्या असून, त्या ठिकाणी अनुक्रमे दोन्ही महामानवांचे पुतळे उभारले जाणार आहेत.

दरम्यान, अंतिम निर्णयानंतर चौकात पूर्वी ठेवण्यात आलेले पुतळे पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत शांततेत हटवण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणात दोन्ही समाजबांधव संयमी भूमिका तसेच पोलीस प्रशासनाचा समन्वय महत्त्वाचा ठरला. त्यामुळे संभाव्य तणाव टळून शहरात शांतता आणि सौहार्द कायम राहिले आहे. स्थानिक नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत करत, “दोन्ही महापुरुषांचा सन्मान राखत घेतलेला हा निर्णय आदर्श ठरेल,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान या निर्णयामुळे शहरातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे शहरातील दोन्ही समाज बांधवाकडून व सर्व नागरिकाकडून स्वागत करण्यात आले.

 
Top