भूम (प्रतिनिधी)-  सध्या वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांना मोठा दिलासा देणारा उपक्रम भूम बसस्थानकात राबविण्यात आला आहे. पत्रकार अरविंद शिंदे, धनंजय शेटे व तानाजी सुपेकर यांच्या संकल्पनेतून तसेच भूम तालुक्यातील शिक्षकांच्या पुढाकाराने बसस्थानक परिसरात थंड पिण्याच्या पाण्याची पाणपोई उभारण्यात आली असून तिचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.

भूम बसस्थानकात एसटी महामंडळाकडून पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना व प्रवाशांना कडक उन्हात पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः सात ते आठ शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी बसची प्रतीक्षा करताना उष्णतेचा सामना करत होते. तसेच खेडेगावातून ये जा करणाऱ्या नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो म्हणून ही गरज ओळखून पत्रकारांनी पुढाकार घेतला व शिक्षकांनी सहकार्य करत पाणपोईची व्यवस्था उभी केली.

या उपक्रमामुळे आता विद्यार्थ्यांसह नागरिक व प्रवाशांना थंड पाणी सहज उपलब्ध होत असून उन्हाच्या तीव्रतेत मोठा दिलासा मिळत आहे. सध्याच्या उष्ण वातावरणात अशी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी पत्रकार व शिक्षकांचे मनसोक्त आभार मानत उपक्रमाचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

उद्घाटन प्रसंगी सोमनाथ टकले, संजीवन तांबे, दत्ता गुंजाळ, आबासाहेब ढगे, औदुंबर कोल्हे, दत्ता घोडके, अंगद मिसाळ यांच्यासह विद्यार्थी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


 
Top