भूम (प्रतिनिधी)- भूम-परंडा तालुक्यातील श्रीक्षेत्र काळभैरवनाथ सोनारी येथे दरवर्षी मोठ्या श्रद्धा-भावनेने भरत असलेल्या यात्रेसाठी हजारो भाविक पायी, दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनांनी दर्शनासाठी येत असतात. यंदा वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे यात्रेकरूंना प्रवासादरम्यान मोठ्या उष्णतेचा सामना करावा लागत असल्याने चिंचपूर ढगे येथील ग्रामस्थांनी सेवाभावातून पुढाकार घेत भाविकांसाठी दिलासा देणारी व्यवस्था उभारली आहे.
पंचायत समितीचे सभापती विशाल ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी एकत्र येत सोनारीकडे जाणाऱ्या मार्गावर पिण्याचे थंड पाणी, चहा, नाश्ता तसेच काही ठिकाणी जेवण व मठ्ठ्याची व्यवस्था केली आहे. चिंचपूर ढगे हे यात्रेकरूंच्या मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची वर्दळ पाहायला मिळत आहे.
