तुळजापूर (प्रतिनिधी)- चैत्री पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना यंदा अवकाळी पाऊस, खंडित वीजपुरवठा आणि अतिक्रमणांमुळे मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागले. बुधवारी सायंकाळपासून गुरुवारी पहाटेपर्यंत झालेल्या पावसामुळे भाविकांचे प्रचंड हाल झाले.
अवकाळी पावसात अनेक भाविकांना भिजतच दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागले. मंदिर परिसरात नारळ फोडल्यामुळे रस्ते निसरडे झाले होते. त्यामुळे चालणेही कठीण झाले. अवकाळी पावसाच्या काळात काही काळ वीजपुरवठा खंडित होत असल्याने भाविकांचे हाल झाले.
शुक्रवार पेठकडे जाणाऱ्या मार्गावर दुचाकी वाहनांची अनधिकृत पार्किंग, फूटपाथवर बसलेले विक्रेते यामुळे भाविकांना मंदिराकडे जाणे अत्यंत त्रासदायक ठरले. नगरपालिकेचे अतिक्रमण हटाव पथक आले की विक्रेते तात्पुरते हटत, मात्र पथक गेल्यानंतर पुन्हा त्याच जागी बसत असल्याचे चित्र दिसले. चैत्री पौर्णिमेसाठी येणारे अनेक भाविक शुक्रवार पेठ पाण्याची टाकी परिसर, साळुंखे गल्ली, भोसले गल्ली या भागात वास्तव्यास असतात. मात्र यात्रा नियोजनात या भागांचा समावेशच नसल्याने मूलभूत सुविधांचा अभाव जाणवला.
यंदा नव्याने सुरू झालेल्या हडको वाहनतळावर हजारो वाहने उभी राहतात. येथून मंदिर फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असल्याने बहुसंख्य भाविक शुक्रवार पेठ मार्गेच मंदिरात जातात, तरीही या मार्गाकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकंदरीत, चैत्री पौर्णिमा यात्रा उत्साहात पार पडली असली तरी नियोजनातील त्रुटी, अतिक्रमण, पावसाचा फटका यामुळे भाविकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागले.

