तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीने आता चिंताजनक रूप धारण केले आहे. चैत्री पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी मंदिर येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या मोठ्या गर्दीत वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गुरुवार (दि. 2) रोजी सकाळी धाराशिव रोडवर वाहतूक नियंत्रणादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांना रस्त्यात उभी असलेली बस दिसली. याबाबत त्यांनी चालकाला जाब विचारला असता बसमधील प्रवासी व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. वाद वाढत जाऊन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. अखेरीस पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले.
बसमधील भाविकांनी “आम्ही भांडणासाठी नाही, देवदर्शनासाठी आलो आहोत; मात्र अधिकाऱ्यांनी आम्हाला धक्का बुकी केली,” असा आरोप केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक भाविकांनी तो पाहिला आहे. यामुळे वातावरणात तणावाची भावना निर्माण झाली आहे.
चैत्री पौर्णिमेसारख्या मोठ्या यात्रेदरम्यान वाहतूक नियोजन अपुरे वाहनतळ व्यवस्थेचा अभाव, पोलिस-भाविक संवादातील ताण या समस्यांमुळे परिस्थिती अधिकच बिघडताना दिसत आहे.
तीर्थक्षेत्र असल्यामुळे भाविकांची भावना जपणे आवश्यक आहे. पोलिसांनी संयमाने वागणे गरजेचे आहे. थोडाही तणाव वाढल्यास मोठा अनुचित प्रसंग घडू शकतो. अशी चर्चा सध्या तुळजापूर शहरात जोर धरत आहे. या घटनेनंतर पोलिस प्रशासन कोणती कारवाई करणार, तसेच वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
