भुम (प्रतिनिधी)-  माणकेश्वर येथील गट क्रमांक 318 मधील सरकारी जमिनीवर असलेल्या श्रीक्षेत्र माणकेश्वर महादेव मंदिर परिसरात प्रशासनाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर येत आहे. मंदिर परिसरात अवैध पद्धतीने मटण शिजवणे, मटणाचा नैवेद्य आणणे यावर प्रशासनाने बंदी घातली होती, मात्र आता पुन्हा हे प्रकार सुरू झाल्याने ह.भ.प. गणेश महाराज अंधारे यांनी  दिनांक 06 एप्रिल 2026 पासून पुन्हा एकदा अन्नत्याग करून आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने मंदिर परिसरातील पावित्र्य राखण्यासाठी मांसाहार आणि अवैध कृत्यांवर बंदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे संपूर्ण हिंदू धर्मीय भाविक आणि ग्रामस्थांनी स्वागत केले होते. मात्र, प्रशासनाच्या या निर्णयाला काही लोकांकडून हरताळ फासला जात असून, पुन्हा अवैध पद्धतीने मटणाचा नैवेद्य दाखवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या असून महाराजांनी तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.


उपोषणातील प्रमुख मागण्या

मंदिर परिसरात मटणाचा नैवेद्य आणणे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. राज्य संरक्षित स्मारक स्थळांवरील नियमांनुसार मंदिर परिसरातील सर्व अवैध अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावीत. मंदिरात मांसाहार न करणाऱ्या सात्त्विक पुजाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. श्री सटवाई देवीच्या मूर्तीवरील शेंदूर काढून मूर्ती शास्त्रानुसार मूळ स्वरूपात दर्शन खुले करावे.


 
Top