धाराशिव (प्रतिनिधी) - भूम नगर परिषदेतील अनियमितता, भ्रष्टाचार व मनमानी कारभाराच्या विरोधात जनशक्ती शहर विकास आघाडीच्या 15 नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. याबाबत अगोदर निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
नगरसेवकांनी दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा नगर प्रशासन अधिकाऱ्यांकडे विविध गंभीर मुद्द्यांवर सविस्तर निवेदन सादर केले होते. मात्र, त्या निवेदनाची अद्याप दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. नगरसेवकांनी सादर केलेल्या निवेदनात अनेक आर्थिक व प्रशासकीय अनियमिततेचे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. मार्च 2021 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत घनकचरा व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची चौकशी करून संबंधित देयके थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, प्रभारी मुख्याधिकारी प्रवीण जाधव यांनी दलितेत्तर वस्ती सुधार योजना (2024-25) व सुवर्ण जयंती नागरोत्थान योजनेअंतर्गत कामांना सर्वसाधारण सभेचा ठराव न घेता परस्पर प्रशासकीय मान्यता दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही कामे रद्द करून नव्याने ठरावाद्वारे मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या सर्व तक्रारींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, जनशक्ती शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आज (दि.30) सुरू केले आहे. या लाक्षणिक उपोषणासाठी उपनगराध्यक्ष लक्ष्मी साठे, गटनेते रुपेश शेंडगे, अनिल शेंडगे, नवनाथ रोकडे, रामराजे कुंभार, आबासाहेब मस्कर, चंद्रमणी गायकवाड, विठ्ठल बागडे, शमशाद हरून मुजावर, शीतल अमोल गाडे, चंद्रकला हरिश्चंद्र पवार, सुनिता गणेश वीर, नूरजहाँ महंमद इसार मणियार आणि सुरेखा दत्तात्रय काळे हे नगरसेवक सहभागी झाले आहेत.
