धाराशिव (प्रतिनिधी) - तालुक्यातील खामसवाडी येथे मोटरसायकलवर घराकडे जाणाऱ्या दोघांना अडवून जातीय द्वेषातून शिवीगाळ केली. तसेच संगनमताने 10 गावगुंडांनी घरावर दगडफेक करीत घरावरील पत्रे उचकटून पत्रे फाडले. तर लाथा बुक्क्या व दगडाने मारहाण करण्यात आली. त्यामध्ये लोकांना जबर मारहाण केली असून त्यापैकी एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना दि.28 एप्रिल रोजी घडली असून या प्रकरणी आरोपी विरोधात ॲट्रॉसिटी अर्थात अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी गावात मोकाट फिरत असून ते दहशत माजवीत आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करुन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पीडितांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव तालुक्यातील खामसवाडी (बेंबळी) येथे दि.28 एप्रिल रोजी बोधिसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक कार्यक्रम पार पडला. त्यानंतर रात्री 10.30 वाजता आकाश दत्ता अवधुते (रा. खामसवाडी) व अमर सतीश सोनवणे (रा. कात्री, ता तुळजापूर) हे कार्यक्रम स्थळावरून मोटरसायकलवरून खामसवाडी ते बावीकडे त्यांच्या घरी जात होते. त्यावेळी रस्त्यात असलेल्या माने यांच्या पत्र्याच्या कॉम्प्लेक्ससमोर खंडू बापू गुळवे, रंजीत सुरेश गुळवे व ओमकार बालाजी गुळवे हे त्यांच्या गाड्या लावून रस्त्यात उभारले होते. त्यावेळी त्यांना आकाश व अमर यांनी त्यांची गाडी थांबवली आणि आम्हाला घराकडे जाऊ द्या असे म्हणताच त्या चौघाजणांनी त्या दोघांना शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी आकाश व अमर यांनी आमचे चुकले असे म्हणून ते घराकडे निघून गेले. ते घरी गेल्यानंतर खंडू बापू गुळवे, रंजीत सुरेश गुळवे व ओमकार बालाजी गुळवे, महेश वैजिनाथ गुळवे, बालाजी गुळवे, यश ज्ञानेश्वर गुळवे, नागेश ज्ञानेश्वर गुळवे, सोमनाथ भोसले, राजेंद्र गुळवे व सुरेश गुळवे यांनी संगम मत करून आकाश अवधुते यांनी संगणमताने आकाश यांच्या घरावर चालून जात दगडफेक केली. घरावरील पत्रे उचकटून घराचे पत्रे फाडले. तसेच लाथा बुक्या व दगडाने त्या दोघांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत अमर सोनवणे याचे डोके फुटले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी 9 जणाच्या विरोधात बेंबळी पोलीस ठाण्यामध्ये भा.न्या.सं. 2023 अंतर्गत 118 (1), 115 (2), 352, 333, 324 (4), 189, 190, 191 तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 3 (1) (r), 3 (1) (s) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी घटनेच्या ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला आहे. मात्र, सर्व आरोपी गावात फिरत असून अद्यापपर्यंत एकाही आरोपीला अटक केलेली नाही. विशेष म्हणजे ते माझे एक एकर शेत गेले तरी चालेल पण एका एकाला बघूनच घेतो अशा धमक्या देत आहेत. त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी. तसेच गावातील वातावरण सुरळीत करण्यास मदत करावी, अशी मागणी पिडितांनी केली आहे.
