धाराशिव (प्रतिनिधी)-  अमहाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीचा चैत्री पालखी सोहळा आई राजा उदे उदे... येडासरीचा उदे उदेच्या जयघोषात आणि अभूतपूर्व उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून मागील 10 वर्षांपासून अविरत सुरू असलेली हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. या अनुपम सोहळ्यासोबतच, लाखो भाविकांच्या सोयीसाठी येरमाळा देवस्थानला पंढरपूर आणि तुळजापूरच्या धर्तीवर विशेष यात्रा अनुदान मिळवून देण्याचा संकल्प आमदार पाटील यांनी केला आहे. 

मागील दशकापासून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्याचा जो उपक्रम सुरू केला. तो आता या यात्रेची एक नवी ओळख बनला आहे. पालखी मार्गस्थ होत असताना आकाशातून होणारा फुलांचा वर्षाव पाहून उपस्थित 10 ते 15 लाख भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. केवळ उपस्थित राहणेच नव्हे, तर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार चुनखडी वेचण्याच्या विधीमध्ये स्वतः सहभागी होऊन आई येडेश्वरीचे मनोभावे दर्शन घेतले. येरमाळा येथील चैत्र यात्रेला दरवर्षी 10 ते 15 लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतात. सध्या या भव्य यात्रेच्या नियोजनाचा आर्थिक भार ग्रामपंचायतीवर पडतो. भाविकांना दर्जेदार सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी पंढरपूर आणि तुळजापूरच्या धर्तीवर येरमाळा यात्रेला विशेष यात्रा अनुदान मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.


येरमाळ्याचा तीर्थक्षेत्र विकास आरखडा तयार करून कायापालट करण्याचे प्रयत्न 

आई येडेश्वरीच्या चरणी नतमस्तक होणे हे माझ्यासाठी केवळ कर्तव्य नसून ती एक आत्मिक शक्ती आहे. या परिसराचा विकास आणि भाविकांना मिळणाऱ्या सुविधांना प्राधान्य देणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. येरमाळ्याला तुळजापूर प्रमाणे तीर्थक्षेत्र विकास आरखडा करून राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून ग्रामपंचायतीला असलेली उत्पन्नाचे अत्यल्प साधने पाहता यात्रा अनुदान मिळावे, यासाठीचे प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे


 
Top