धाराशिव (प्रतिनिधी)- “जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल 2026 ” निमित्त “हिवताप दुरिकरणासाठी कटिबद्ध : आता हे शक्य आहे.आता हे केलेच पाहिजे” या घोषवाक्याखाली जिल्हा हिवताप कार्यालय,धाराशिव यांनी व्यापक जनजागृतीचे आवाहन केले आहे.
दरवर्षी 25 एप्रिल रोजी ‘जागतिक हिवताप दिन’ साजरा केला जातो. यावर्षीचे जागतिक घोषवाक्य “Driven to End Malaria: Now We Can. Now We Must”म्हणजेच “हिवताप दुरिकरणासाठी कटिबद्ध आता हे शक्य आहे.आता हे केलेच पाहिजे” असे आहे.
केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय हिवताप दुरीकरण कार्यक्रम’ अंतर्गत सन 2030 पर्यंत हिवतापाचे संपूर्ण दुरीकरण करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.हिवताप हा डासांमार्फत पसरणारा गंभीर आजार असून वेळेवर निदान व उपचार न झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो.जिल्ह्यात हिवताप नियंत्रणासाठी आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. हिवतापाची लागण व प्रसार : हिवताप हा प्लास्मोडियम परजीवीमुळे होणारा आजार आहे.मादी ॲनाफिलीस डास चावल्यामुळे या परजीवींची लागण होते व एका रुग्णापासून दुसऱ्या निरोगी व्यक्तीला रोगाचा प्रसार होतो.
लक्षणे
थंडी वाजून जोराचा ताप येणे, त्यानंतर घाम येऊन ताप उतरणे, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, उलट्या, थकवा व भूक मंदावणे ही प्रमुख लक्षणे आहेत.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
घर व परिसरात पाणी साचू देऊ नये. आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा. रात्री मच्छरदाणीचा वापर करावा. पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरावेत.ताप आल्यास तात्काळ शासकीय दवाखान्यात मोफत रक्त तपासणी व उपचार करून घ्यावा. ताप आल्यास तात्काळ नजीकच्या शासकीय दवाखान्यात मोफत रक्त तपासणी व उपचार करून घ्यावा. घर व परिसरात पाणी साचू देऊ नये, आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा, रात्री मच्छरदाणीचा वापर करावा. हिवताप हद्दपार करणे ही केवळ आरोग्य विभागाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. चला,2030 पूर्वी धाराशिव जिल्हा हिवतापमुक्त करण्यासाठी आजच कटिबद्ध होऊया.
पारेषण काळापूर्वीची तयारी
हिवतापाचा प्रसार साधारणतः जून ते नोव्हेंबर या पावसाळी व पारेषण काळात जास्त होतो. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यातच गावपातळीवर स्वच्छता मोहीम, डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करणे, डबकी बुजवणे, टाक्या व रांजण झाकणे, गप्पी मासे सोडणे, कीटकनाशक फवारणीसाठी सूक्ष्म आराखडा तयार करणे ही कामे जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत हाती घेतली जातात. नागरिकांनीही यात सहभाग घेऊन आपला परिसर डासमुक्त ठेवावा.
सर्व नागरिकांनी आपल्या शौचालयावरील व्हेंट पाईपवर जाळी बसवून घ्यावी,त्यामुळे डासांची उत्पत्ती होणार नाही व कीटकजन्य आजारांचा प्रसार टाळता येईल,असे आवाहन डॉ.एस.एल.हरिदास, जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद धाराशिव यांनी केले आहे. शहरी भागातील नागरिकांनी आपल्या परिसरातील नालेसफाई करून साचलेले पाणी वाहते ठेवावे, त्यामुळे डासांची पैदास होणार नाही व कीटकजन्य आजारांचा प्रसार रोखता येईल,असे डॉ.धनंजय चाकुरकर जिल्हा शल्य चिकित्सक धाराशिव यांनी सांगितले.
तसेच सर्व नागरिकांनी,विशेषत विद्यार्थ्यांनी मलेरिया ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून काम करावे. घरातील पाण्यात डासांची अळी तयार झाल्यास ते भांडे रिकामे करून कोरडे होऊ द्यावे, त्यामुळे डासांच्या जीवनचक्राची साखळी खंडित होते. असे आवाहन डॉ.विनयशील कुलकर्णी जिल्हा हिवताप अधिकारी यांनी केले आहे.