धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेची लाट तीव्र होत असून विविध क्षेत्रात कार्यरत कामगार व मजूर यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.श्रम व रोजगार मंत्रालय तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,गृह मंत्रालय यांच्या सूचनांनुसार उद्योग,ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना,कारखाने,दुकाने व इतर संस्थांनी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कामगारांना स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, कामाच्या ठिकाणी सावली अथवा विश्रांतीसाठी जागा उपलब्ध करून देणे, तसेच दुपारी 12 ते दुपारी 4 या कडक उन्हाच्या वेळेत काम टाळणे किंवा कामाच्या वेळेत आवश्यक बदल करणे यावर विशेष भर देण्यात आला आहे. यासोबतच उष्माघात व उष्णतेच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करणे, प्राथमिक उपचार व आपत्कालीन सुविधा उपलब्ध ठेवणे आणि कामगारांना या कालावधीत शारीरिक श्रमाची कामे देऊ नयेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. बांधकामासारख्या उष्णतेच्या परिस्थितीत होणाऱ्या कामांसाठी आरामदायी आईस पॅकची व्यवस्था करणे,नियमित आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाशी समन्वय साधणे, तसेच कामगारांना उष्णतेच्या लाटेचे धोके व प्रतिबंधात्मक उपायांबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी गोविंद गावंडे यांनी केले आहे.