कळंब (प्रतिनिधी)- कळंब येथील एसटी बस स्थानकात स्मार्ट कार्ड काढण्यासाठी अधिकृत सुविधा नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने तात्काळ अधिकृत एजन्सीची नेमणूक करावी, अशी जोरदार मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

सध्या बस स्थानकाबाहेर काही एजंटांकडून स्मार्ट कार्डासाठी तब्बल 300 रुपये वसूल केले जात असल्याची तक्रार समोर येत आहे. ही वसुली अधिकृत नसल्याने प्रवाशांची उघडपणे आर्थिक लूट होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याकडे राज्य परिवहन महामंडळाने तात्काळ लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

दरम्यान, “जर कोणी जास्त पैसे घेत असल्याचे आढळले, तर संबंधितांविरोधात थेट कळंब एसटी आगार प्रमुखांकडे तक्रार करावी. दोषींवर तात्काळ कारवाई केली जाईल,” असे आश्वासन आगार प्रमुख विजयकुमार घोलप दिले आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिक, अमृत योजनेतील लाभार्थी तसेच दिव्यांग प्रवाशांची यामुळे मोठी हेळसांड होत आहे. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी त्यांना बाहेर फिरावे लागत असून आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

त्यामुळे कळंब बस स्थानकातच अधिकृतपणे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी स्वतंत्र काउंटर व कर्मचारी नेमण्यात यावा, अशी ठाम मागणी आता प्रवासी वर्गातून जोर धरत आहे. या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


प्रमुख मागण्या

कळंब बस स्थानकात स्मार्ट कार्डसाठी अधिकृत एजन्सी नेमावी, प्रवाशांकडून होत असलेली अवैध वसुली तात्काळ थांबवावी,ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करावी, दोषी एजंटांवर कडक कारवाई करावी.


स्मार्ट कार्ड नसले तरीही सवलत; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन !

स्मार्ट कार्ड नसल्यास प्रवाशांना सवलत मिळणार नाही, अशी अफवा पसरत असताना कळंब आगार प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका मांडत नागरिकांना दिलासा दिला आहे. स्मार्ट कार्ड नसले तरी पात्र लाभार्थ्यांना सवलतीचा प्रवास सुरूच राहणार असल्याचे आगार प्रमुख विजयकुमार घोलप यांनी स्पष्ट केले आहे. राज्य परिवहन महामंडळामार्फत 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, तसेच 75 वर्षांवरील वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते. या योजनेअंतर्गत स्मार्ट कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरू असली, तरी अनेक प्रवाशांकडे अद्याप स्मार्ट कार्ड उपलब्ध नाही.

याच पार्श्वभूमीवर “स्मार्ट कार्ड नसल्यास सवलत मिळणार नाही” अशी चुकीची समजूत काही ठिकाणी पसरली आहे. मात्र, आगार प्रमुखांनी ही अफवा फेटाळून लावत स्पष्ट केले की, ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड उपलब्ध नाही, अशा पात्र लाभार्थ्यांनाही नियमानुसार सवलतीचा लाभ दिला जात आहे आणि पुढेही दिला जाणार आहे. सवलतीची प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येत असून प्रवाशांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पात्र प्रवाशांनी लवकरात लवकर स्मार्ट कार्ड काढून घ्यावे, असेही आगार प्रमुख विजयकुमार घोलप यांनी केले आहे.

 
Top