कळंब (प्रतिनिधी)- “ना पाऊस, ना वादळ तरीही वीज गायब!” असा संतप्त सवाल करत कळंब शहर व परिसरातील नागरिकांनी वीज वितरण व्यवस्थेवर तीव्र रोष व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सलग दर दोन तासांनी वीज पुरवठा खंडित होत असून, प्रत्येकवेळी दोन-दोन तास अंधाराचा सामना करावा लागत आहे.

उन्हाच्या तीव्रतेत भर पडत असताना होणाऱ्या या लोडशेडिंगमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. विशेषतः रुग्णालयातील रुग्ण, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. “गरमीने हैराण आणि वर वीज गायब” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

शंभर टक्के वसुली, पण सेवा कुठे?

नागरिकांकडून वीज बिलाची शंभर टक्के वसुली होत असताना अशा प्रकारे वारंवार वीज खंडित होणे म्हणजे “शहाण्याला बुक्क्याचा मार” असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. नियमित पैसे भरूनही सेवा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.

 

प्रशासन झोपेत? नागरिकांचा सवाल

वीज वितरण यंत्रणा नेमकी कोणत्या कारणामुळे ठप्प होत आहे, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. “ना पावसाचा अडथळा, ना तांत्रिक कारणांची माहिती मग वीज जाते कुठे?” असा थेट सवाल प्रशासनाला विचारला जात आहे.


तात्काळ उपाययोजनांची मागणी

या गंभीर परिस्थितीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात येत आहे. दरम्यान, वारंवार होणाऱ्या या वीज खंडितीमुळे कळंबकरांचा संयम संपत चालला असून, “आता तरी प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल सर्वत्र उपस्थित केला जात आहे.


 
Top