कळंब (प्रतिनिधी)- तब्बल 92 गावांचा कारभार सांभाळणारी कळंब पंचायत समिती आज अक्षरशः ‌‘देवाच्या भरोशावर‌’ चालत असल्याचे चित्र समोर आले आहे. ना सभापती, ना गटविकास अधिकारी, ना आरोग्य अधिकारी आणि सर्वात धक्कादायक म्हणजे अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची कोणतीही सक्षम व्यवस्था नाहीअशी दयनीय अवस्था सध्या येथे निर्माण झाली आहे.

एकीकडे ग्रामीण भागातील नागरिक विविध कामांसाठी पंचायत समितीकडे धाव घेतात; मात्र संबंधित अधिकारी वेळेवर उपलब्धच नसल्याने त्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. कोणी अधिकारी अपडाऊन करतो, तर कोणी भाड्याच्या घरात राहत असल्याने कार्यालयीन वेळेत त्यांची उपस्थिती अनियमित असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

विशेष म्हणजे, 2009 पूर्वी पंचायत समितीच्या आवारात सभापती, गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, कृषी अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने (क्वार्टर) उपलब्ध होती. मात्र, प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे ही निवासस्थाने आज पूर्णपणे निस्तनाबूत झाली आहेत. काही इमारती पडीक अवस्थेत आहेत, तर काहींचे अक्षरशः उकिरडे झालेले दिसून येते. यामुळे मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. 


या दुर्दशेला जबाबदार कोण?

नागरिकांना आपले काम करायचे असल्यास नेमका अधिकारी कुठे मिळणार, हा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. “कार्यालय आहे, पण अधिकारी नाहीत; आणि अधिकारी आहेत, पण सापडत नाहीत,” अशी उपरोधिक प्रतिक्रिया ग्रामस्थ देत आहेत. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून निवासस्थानांची दुरुस्ती करावी, अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करावी आणि पंचायत समितीचा कारभार सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे. अन्यथा येणाऱ्या काळात आंदोलनाचा इशाराही दिला जात आहे.

 
Top