धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती धाराशिव, अक्षरवेल आणि ब्रम्हा कुमारी परिवार तर्फे आयोजित कवयित्री बी. के. सुरभी यांच्या मोरपिस व अवघा रंग या पुस्तकांच्या प्रकाशनानिमित्त सिद्धेश्वर वडगाव येथे आयोजित गझल मुशायऱ्यात अनेक दर्जेदार गझलांचे सादरीकरण झाले. या मुशायऱ्याच्या अध्यक्षस्थानी धाराशिव येथील गझलकार सुनिता गुंजाळ कवडे या होत्या. तर ज्येष्ठ गझलकार राजेंद्र अत्रे, साहित्य भारती देवगिरी प्रांत मंत्री युवराज नळे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.                                   

मुशायऱ्याच्या सुरुवातीला धाराशिव येथील गझलकार मीना महामुनी यांनी ओढ नाही राहिलेली माणसाची माणसाला, दुःख सारे सांग आता अंतरीचे विठ्ठलाला, शेण मातीच्या घरातच लेकरे घडली सुसंस्कृत, वाढल्या क्राँक्रीट भिंती कोण नाही आस-याला ही गझल सादर करून मुशायऱ्याची जोरदार सुरुवात केली.

त्यानंतर बीड येथून आलेले बापू धनवे यांनी ऋतूप्रमाणे आयुष्याला बदलत गेलो, भिजलो ना गारठलो नुसता करपत गेलो, अथांग सागर व्हावे इच्छा मनात होती, झरा जाहलो आनंदाने झिरपत गेलो, ही गझल सादर करून सभागृहाची वाहवा मिळवली.

धाराशिव येथील गझलकार कृष्णा साळुंके यांनी यह क्या खुलूस हो, यह कैसा खुमार हो, बड़े गुम रहते हो, ऐसा भी क्या गुबार हो, औ जो भटकते हो युं अकेले बेमतलब, कौन खुशी के तुम कहना शहरयार हो, ही हिंदी गझल सादर करून उपस्थितांची मने जिंकली. वैराग येथील गझलकार जीवन धेंडे यांनी 

एक टेबल,चहा ती तिचा चेहरा... काय नाही पुढे आठवत आणखी... रात्र आहे किती दरवळत आणखी...कोण आहे सुगंधी जळत आणखी... ही गझल सादर करून मुशायऱ्यात बहार आणली. गंगाखेड येथून आलेले यशवंत मस्के यांनी थोडी थोडी म्हणता म्हणता बक्कळ वाया गेली, असे वाटते या जन्मीची चक्कर वाया गेली, कळला नाही तिच्या मनाला भाव मनाचा माझ्या, तिच्याच साठी यशवंताची अक्कल वाया गेली, या गझलेतून सभागृहाला हसायला भाग पाडले. स्नेहलता झरकर अंदुरे यांनी वादळ येते तसेच फिरते.. विशेष काही नाही, फक्त इकडचे तिकडे करते.. विशेष काही नाही, कर्तव्याच्या तळपायांची चाळण होते दिवसा,फुंकर मारत रात्र सरकते.. विशेष काही नाही, या गजलेतून विचार करायला भाग पाडले. करमाळा येथील गझलकार नवनाथ खरात यांच्या एक झलक तुझी मला रात्र जागवायची, सोड ना सखे तुझी सवय वळुन बघायची, द्यायचे न घ्यायचे आपल्या मधे नको, मी कितीक घ्यायचो तू कितीक दयायची

या गझलला रसिकांनी भरभरून दाद दिली. गंगाखेड येथील गझलकार डॉ. अविनाश कासांडे  यांनी जीवनी जसजसा ढासळत राहिलो, मी स्वत:ला तसा आढळत राहिलो, शब्द होते कुठे बोलण्यासारखे ? ती मला मी तिला न्याहळत राहिलो, ही तरन्नूम गझल सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. ऋचा पत्की यांनी सादर केलेल्या आईवरील गझलेने सभागृहाला भावुक केले. डॉ. रेखा ढगे यांनी सादर केलेली, कशाला उगा केस मी डाय केले, असे रंगले अन मला बाय केले, कसा रंग माझा होता कळेना, बघातोंड वांगे जसे फ्राय केले ही गझल भाव खाऊन गेली.  गझलकार युवराज नळे यांनी सादर केलेल्या  चेहऱ्यावर भाळणे नाही बरे, विस्तवाशी खेळणे नाही बरे..भिड जरासा संकटाला मैतरा,कासरा कवटाळणे नाही बरे.. या गझलेला रसिकांनी डोक्यावर घेतले. राणी सावरगाव येथील सुप्रसिद्ध गझलकार आत्माराम जाधव यांची  अंधश्रद्धा मला सत्य वाटायची, माय जेंव्हा कधी दृष्ट काढायची, काजळा सारखा रंग माझा तरी

माय माझी मला तीट लावायची, ही गझल रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन गेली. लातूरच्या गझलकार जना घुले यांनी काय करावे नव्हते उमजत हरकत नाही, माझेच मला होते फसवत हरकत नाही, या गझलेतून रसिकांची दाद मिळवली. प्रा.विद्या देशमुख यांच्या रंग  ,झेंडे,चिन्ह, नेते  फक्त होते, एक सारे लाल जेव्हा रक्त होते, तुमची असेल मोठी गगनात झेप तुमच्या, नाही कधीच दुबळी मीही नभात माझ्या, ही गझल अतिशय लक्षवेधी ठरली. गझलकार बाळ पाटील यांनी नेमके जे न्यायचे ठेवून गेली, विश्वशांती माणसे ठेवून गेली, हे किती बुजगावणे ते छान केले, पाखरे अंगावरी खेळून गेली, ही गझल सादर करून रसिकांची दाद मिळवली. खात्रीने जर वसंत येतो बहरायाला खंत उगा मी पानगळीची करू कशाला, प्राजक्ताची क्षणभंगुरता मी अनुभवली, अन जगण्याचा अर्थ नव्याने मला समजला, तुळजापूर येथील गझलकार कांचनगंगा मोरे यांनी या गझलेतून आशावाद मांडला. डॉ . सुलभा देशमुख यांनी बाप म्हणतो लेक मोठी फार नाही मांडला मी पण तिचा बाजार नाही, मान्य आहे की मुलींची वाण आहे, अन्‌‍  उडत दारात आता बार नाही, या गझलेतून मुलीच्या भावना व्यक्त केल्या. जीवनाच्या राहिलो कर्जात आपण, आणि मरणाच्या किती धाकात आपण, जर रिकामे शेवटी जाणार होतो, एवढे का वागलो ताठ्यात आपण लातूर येथील गझलकार वंदना केंद्रे -बांगर यांच्या या गझलेने सभागृहाला विचार करायला भाग पाडले. गझलकार बी. सुरभी यांनी अत्तराचा बोलबाला फार होतो. पण फुलांचा केवढा बाजार होतो, का तिला हो अस्त्र केले पागलांनी, चीरहरणाने तिच्या बेजार जो तो, ही गझल सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. ज्येष्ठ गझलकार राजेंद्र अत्रे यांनी मांडलेला डाव हा मी टाकुनी जाणार नाही, हार होवो जीत होवो यापुढे माघार नाही, सूर्य केव्हा मागतो का भीक अंधारासमोरी, जे कधी होणार नाही ते कधी होणार नाही, ही गझल सादर करून मुशायऱ्यात रंगत आणली. पालम येथील गझलकार आत्तम गेंदे यांनी, आता केवळ तेच आपला पूर्ण अध्याय करू शकते.. मला कृष्ण अन तुला राधिका फक्त  करू शकते.. शाळेइतकी सोपी नसते शाळेबाहेरची शाळा, ही दुनिया केव्हाही ध चा म, एक्स चा वाय करू शकते.  ही गझल सादर करून मुशायऱ्याला उंचीवर नेले. मुशायऱ्याचे सुत्रसंचालक गझलकार शेखर गिरी यांनी घेऊन जवळ प्रेमाने कुरवाळू शकलो नाही, मी सुखास माझ्या क्षणभर सांभाळू शकलो नाही, मित्राने वार किती तो प्रेमाने केला होता, मी वार म्हणूनच त्याचा मग टाळू शकलो नाही, ही गझल सादर केली. शेवटी मुशायऱ्याच्या अध्यक्ष सुनिता गुंजाळ कवडे यांनी तुला कळेना काय नेमके गमवलेस तू, चवळी सोडुन भोपळ्यास का निवडलेस तू, सगळ्या नजरा खिळल्या होत्या  माझ्यावरती, उखाण्यामधे थेट नाव तर घेतलेस तू, सरडा सुद्धा किती लाजला पाहून तुला, आभार किती मानू इतके शिकवलेस तू, या गझलेने मुशायऱ्याचा समारोप केला. शेवटी बी. के. सुरभी यांनी उपस्थितांचे आभार मानले. गझल मुशायऱ्याला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top