धाराशिव (प्रतिनिधी)- कुटुंब प्रबोधन, संस्कार, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य, पर्यावरण संरक्षण व राष्ट्रभक्ती यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भर असुन या पंचसूत्रीतुन समाज परिवर्तन करण्यावर भर आहे. भौतिक प्रगती सोबत अध्यात्मिक भाव वाढणे गरजेचे आहे. नशामुक्त भारत संकल्प असुन संस्कारमय पिढी घडवण्याची सर्वांची जबाबदारी आहे त्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सह सरकार्यवाह डॉ कृष्णगोपाल यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सामाजिक जीवनातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी “प्रमुख नागरिक संगोष्ठी“ (परिसंवाद) कार्यक्रम संपन्न झाला, यात डॉ कृष्णगोपालजी यांनी संवाद साधत मार्गदर्शन केले. व्यासपीठावर जिल्हा संघचालक ऍड रवींद्र हरिदास कदम, लातुर संघचालक संजय अग्रवाल उपस्थितीत होते.
संघाच्या 90 हजार शाखा रोज होत असुन 40 हजार साप्ताहिक व मासिक शाखा अश्या 1 लाख 30 हजार ठिकाणी संघ स्वयंसेवक एकत्र येतात व मातृभूमीची प्रार्थना करतात. संघांचे कार्य गेली 100 वर्षापासुन निरंतर चालत असुन ते दिवसेंदिवस वाढत आहे. हिंदू समाजाने संघ कार्य समजुन घेतले पाहिजे, हे कार्य सर्वांचे आहे. हेडगेवार यांनी लढा दिला त्यांनी सुरु केलेले कार्य देशव्यापी बनले आहे. 3 हजार वर्षापुर्वी भारत जागतिक मोठे आर्थिक केंद्र होते, इथून अनेक वस्तु निर्यात केल्या जायच्या. तक्षशिला, नालंदा यासह अनेक ठिकाणी विश्वविद्यालय चालवले जायचे, तिथे 10 हजार विद्यार्थी एका वेळेस शिक्षण घ्यायचे. अनेक महान राजे जग जिंकणारे इथे होते. अंकगणित, बीज गणित यासह नक्षत्र व अंतराळ, वैदिक, व्याकरण भाषा, कपडे, परिमाण व्यवस्था, कृषी व तंत्रज्ञान हे भारताने जगाला दिले असल्याचे डॉ. कृष्णगोपाल यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यवाह अजय जानराव यांनी केले. ऍड सचिन सुर्यवंशी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. यशवंत सुर्यवंशी यांनी व्यक्तीक गीत सादर केले. सुत्रसंचलन विश्वास कांबळे यांनी केले.
राजे एकत्र आले नाहीत
काही परकीय लोक आले व त्यांनी देशात जझिया कर आकारला, धर्मातर केले, अनेक अत्याचार 1 हजार वर्ष केले. भारताने कधी कुणाला लुटले नाही, महिलावर अत्याचार केला नाही. अध्यात्मत श्रेष्ट असताना भारतात अत्याचार झाले. देशात जातीय, आर्थिक, भाषा, वर्ण विभाजन झाल्याने परकीय आक्रमण झाले. भारतातील सगळे राजे एकत्र आले नाहीत. गझनी, गौरी, अबद्दली, बाबर, इस्ट इंडिया कंपनी, इंग्रज यांच्या विरोधात एकत्र आले नाहीत हे लोक एक एकाला हरवत आले आणि जिंकले. ते एकत्र कधी आले नाही. हिंदू समाज माझा आहे असा भाव निर्माण झाला पाहिजे. यातूनच डॉ हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली.
हजारो वर्ष जुना हिंदू समाज
देशाची दुर्दैशेला परकीय, इंग्रज जबाबदार नसुन भारतीय आहेत. कर्मकांड व रूढीमध्ये आपण अडकुन राहिलो. हेडगेवार यांनी देशात शाखा सुरु केल्या, मणिपूर, आसाम, लेह लड्डाख, जैसलमेर, अंदमान निकोबार अश्या अनेक ठिकाणी आता शाखा सुरु आहेत.
इस्लाम व इसाई पेक्षा हजारो वर्ष जुना हिंदू समाज असुन इतिहास, कर्मकांड, अध्यात्म, विविधता आहे. सन्मान, धोका न देणे ह्या भावांना मानणारा हिंदू आहे. हिंदुत्व मर्यादित नसुन त्यात अनेक ग्रंथ, पुस्तके, रूढी परंपरा आहेत. जो सगळ्यांची चिंता करतो, काळजी घेतो,जीवन जगण्याची पद्धती देतो, संस्कार शिकवतो, समाजात राहायला शिकवतो तो हिंदू आहे, आता हे जगाला कळत आहे. अमेरीका, रुस व इतर देशातील लोक आता भारतात हिंदू समजण्यासाठी येत आहेत.
