तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर तालुक्यातील तिर्थ बुद्रुक येथे शेतात अचानक लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सिंचन साहित्य जळून लाखो रुपयांचा फटका बसला आहे. ही घटना सोमवार (दि. 6 एप्रिल) रोजी दुपारी घडली.

शेतकरी संपत अंबादासराव जळके यांच्या गट नं. 297 येथील शेतात अचानक आग लागली. या आगीत स्प्रिंकलर सेटचे सुमारे 35 पाईप व टी-एल्बो साहित्य, ठिबक सिंचनाचे 40 बंडल पूर्णपणे जळून खाक झाले. दुपारी सुमारे 1.40 वाजता शेतकऱ्यांना फोनवरून माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले असता, शेतातील सोयाबीन व हरभऱ्याचे भरडलेले काड (भुसकट) पेट घेतल्याचे दिसून आले. अब्याच्या झाडाखाली ठेवलेले सिंचन साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे आगीची तीव्रता एवढी होती की, सुमारे 50 फूट अंतरावरही झळ जाणवत होती, त्यामुळे आग विझविणे अत्यंत कठीण झाले होते. या आगीत परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही फटका बसला असून, मोरे  यांचेही पाईप जळाल्याचे समोर आले आहे. अनेक शेतांच्या बांधांवरही आग पसरली होती. घटनेनंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संबंधित डी.पी. मागील महिन्यापासून बंद असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की, “डी.पी. सुरू असता तर पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणता आली असती.” या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. अवकाळी संकटे, वाढती उष्णता आणि आता आगया तिहेरी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून प्रशासनाने तातडीने मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 
Top