धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ होत असून भारतीय हवामान खात्याने एप्रिल महिना तसेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमान आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून उष्माघात प्रतिबंधक आणि उपचारात्मक उपाययोजनांसाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीत उष्माघातावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना,तातडीचे उपचार तसेच नागरिकांमध्ये आरोग्य जनजागृती करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.सर्व आरोग्य संस्थांना नागरिकांना योग्य उपचार उपलब्ध करून देतानाच उष्माघाताबाबत आवश्यक आरोग्य शिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभाग,जिल्हा परिषद धाराशिव यांच्या माध्यमातून जिल्ह्यात व्यापक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.त्यानुसार जिल्ह्यातील 5 ग्रामीण रुग्णालये,6 उपजिल्हा रुग्णालये,44 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 2 शहरी आरोग्य केंद्रांमध्ये कोल्ड रूमची स्थापना करण्यात आली आहे. उष्माघातावरील उपचारासाठी आवश्यक औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे.तसेच जिल्हास्तरावर विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आली असून सर्व आरोग्य संस्थांना जनजागृतीसाठी प्रसिद्धी साहित्यही वितरित करण्यात आले आहे.
उष्माघातापासून बचावासाठी आरोग्य विभागाच्या महत्त्वपूर्ण सूचना पुढीलप्रमाणे आहेत :
हे करा
पुरेसे पाणी प्या आणि प्रवासात पाणी सोबत ठेवा.हलक्या वजनाचे,फिकट रंगाचे आणि सैलसर कपडे वापरा.उन्हात जाताना गॉगल,छत्री,पादत्राणे वापरा.टोपी किंवा हॅटखाली ओलसर कपडा ठेवा. पाळीव प्राण्यांना सावलीत व थंड ठिकाणी ठेवा.ओलसर पडदे,पंखे,कुलर यांच्या साहाय्याने घर थंड ठेवा.
हे करू नका
शक्यतो दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळा.कष्टाची कामे उन्हात करू नका.पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका. गडद रंगाचे किंवा तंग कपडे वापरू नका. उष्णतेच्या काळात स्वयंपाक करताना स्वयंपाकघर हवेशीर ठेवा,मद्य,चहा, कॉफी,सॉफ्ट ड्रिंक्स टाळा.अतिप्रथिनयुक्त किंवा शिळे अन्न सेवन करू नका.
उष्माघाताची लक्षणे प्रौढांमध्ये :
शरीराचे तापमान 104 फॅरनहाइट (40 अंश सेल्सिअस) पर्यंत वाढणे,तीव्र डोकेदुखी,स्नायू आखडणे मळमळ, उलटीची भावना,चक्कर येणे,हृदयाचे ठोके वाढणे घाबरणे किंवा चिंता वाटणे.
लहान मुलांमध्ये
आहार घेण्यास नकार,चिडचिडेपणा, लघवीचे प्रमाण कमी होणे,डोळे शुष्क होणे,तोंडाची त्वचा कोरडी पडणे,रक्तस्त्राव होणे,शरीराचे तापमान वाढलेले, गोंधळलेली,बेशुद्ध,अत्याधिक घाम येणारी किंवा घाबरलेली व्यक्ती आढळल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 108 किंवा 102 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नये,कारण उष्माघाताचे गंभीर परिणाम होऊ शकतात.आवश्यक ती खबरदारी घेऊन स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण करावे,असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी केले आहे.