धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यात सध्या युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी बांधव अडचणीत सापडले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध होत नसल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे. शेती हंगामाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर खताची कमतरता भासत असल्यामुळे उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय, काही ठिकाणी शेतकऱ्यांना खतासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत असून, काळाबाजार व साठेबाजीच्या तक्रारीही समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

डॉ. पाटील यांनी प्रशासनाकडे जिल्ह्यात युरिया खताचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे, खताचे न्याय्य व पारदर्शक वितरण सुनिश्चित करणे, तसेच काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे यांसारख्या उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला योग्य प्रमाणात खत मिळेल याची हमी देण्याचीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी सर्वसामान्य शेतकरी बांधवांचीही मागणी आहे.


 
Top