तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीत अभिजीत बाबुराव चव्हाण यांची प्रदेश महासचिवपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली असून, 130 जणांच्या या टीममध्ये चव्हाण यांची पुन्हा निवड झाली आहे.

अभिजीत चव्हाण यांनी संघटनेत तळागाळापासून काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कार्यकर्त्यांना संधी देणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी मनीष शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब, राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रभारी अजय चिकोरा, राष्ट्रीय सचिव नवज्योत सिंग सिद्धू आणि सहसचिव सांभवी शुक्ला यांच्या मान्यतेनंतर ही घोषणा करण्यात आली.

अभिजीत चव्हाण यांनी 2022 मध्ये महासचिव पदाची निवडणूक महाराष्ट्रातून सर्वाधिक मताधिक्याने जिंकली होती. त्यानंतर त्यांनी संघटना मजबूत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे काम केले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी त्यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला होता. तसेच, भारत जोडो अभियानात त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत सहभाग नोंदवला होता. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत पुन्हा एकदा त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.


 
Top