तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शणार्थ तीर्थक्षेत्र तुळजापूरकडे येणाऱ्या जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर महामार्ग वाहतूक पोलिसांकडून तपासणीच्या नावाखाली वाहनधारकांची लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य भाविक नागरिक आणि शेतकरी मोठ्या त्रासाला सामोरे जात असून संतापाची लाट पसरली आहे.
महामार्गावर पोलिसांकडून रस्त्याच्या मध्यभागीच वाहने अडवून तपासणी केली जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः रात्री अपुऱ्या प्रकाशामुळे परिस्थिती अधिक धोकादायक बनत आहे. मार्चअखेर जवळ आल्याने कारवाईचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी तपासणी मोहीम वाढवल्याची चर्चा आहे. तुळजापूर सोलापूर रस्त्यावर तामलवाडी जवळ असणाऱ्या टोलनाक्या वर वाहनांची अडवणूक करून कागदपत्र तपासणी व ऑनलाइन दंड वसुली केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.विशेषता कर्नाटक सह अन्य परराज्यातील भविक वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे झिरो कर्मचार्यांच्या माध्यमातुन ही लुट होत आहे परिवहन मंत्री येथील पालकमंत्री असतानाही भाविकांची होणारे लूट बाबत भाविक खंत व्यक्त करत आहेत वसुली साठी वाहने अधिक वेळ थांबवले जात असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. अचानक ब्रेक लावावे लागल्याने मागून येणाऱ्या वाहनांना अपघाताचा धोका निर्माण होत आहे.
अनेक वाहनचालकांनी किरकोळ कारणांवरून दंड आकारला जात असल्याची तक्रार केली आहे. काही ठिकाणी रोख रक्कम देण्याचा दबाव टाकला जात असल्याचेही सांगितले जात आहे. या कारवाईचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या राशींचे दिवस असल्याने धान्य, कडबा व इतर चारा वाहून नेणारी ट्रॅक्टर, ट्रक, पिकअप व छोटा हत्ती यांसारखी वाहने मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहेत. तसेच दूध वाहतूक करणारी वाहने अडवल्याने माल वेळेत पोहोचत नसून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. नाशवंत मालाच्या बाबतीत ही समस्या अधिक गंभीर ठरत आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची नेमणूक असते. मात्र सध्या तपासणीच्या नावाखाली अडथळे निर्माण होत असल्याने नागरिकांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.