भुम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील उळूप येथे प्रसिद्ध असलेली श्री कानिफनाथ यात्रा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडत असून यात्रेच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक विस्तव चालण्याचा सोहळा भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरला. दि. 24 एप्रिल रोजी रात्री गावातील सर्व जातीधर्मांतील मानकरी मंदिरासमोरील हळ (विस्तव) मधून अनवाणी चालत परंपरेचे पालन करतात.
यात्रेनिमित्त सकाळपासूनच भाविकांनी कानिफनाथाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. ही यात्रा तीन दिवस चालणारी असून दि. 21 एप्रिल रोजी संदल पैठण येथून आणलेल्या गंगाजलाने देवतेला अभिषेक करण्यात आला. दि. 24 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता सुमारे तीस ते पस्तीस भाबळीच्या लाकडांचा वापर करून हळ पेटवण्यात आला. सायंकाळी पाच वाजता मानकऱ्यांना विधीपूर्वक स्नान घालून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सायंकाळी सात वाजता गावातील एकूण तेरा मानकरी परंपरेनुसार विस्तवातून चालले. या वेळी त्यांनी तीन फेऱ्या पूर्ण केल्या. हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.
उळूप येथील कानिफनाथ देवस्थान हे जागृत मानले जाते. नाथ संप्रदायातील चैतन्य कानिफनाथ यांनी येथे तपश्चर्या केल्याची श्रद्धा आहे. त्यांना येथे अग्नीदेवतेची सिद्धी प्राप्त झाल्यामुळेच ही विस्तव चालण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. यात्रेदरम्यान शोभेच्या दारूची आकर्षक आतषबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे ही यात्रा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानली जाते. विविध धर्मीय नागरिक एकत्र येऊन उत्सव साजरा करत असल्याने सामाजिक सलोखा दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यात्रेचे नियोजन विश्वस्त व गावातील ग्रामस्थ एकत्र येत करतात.
